
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेला १ लाख २५ हजारांचे पारितोषिक
परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील वयोगटात उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला. क्रीडा प्राविण्य प्रोत्साहन अनुदान अंतर्गत या यशाबद्दल नूतन विद्यालयाचा गौरव करण्यात आला.
नूतन विद्यालयाचा सन्मान जिल्हा क्रीडा प्राविण्य प्रोत्साहन कार्यक्रमात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सेलू येथील नूतन विद्यालयाला एकूण एक लाख २५ हजार ३०९ रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. मुख्याध्यापक संतोष पाटील, क्रीडा शिक्षक गणेश माळवे व शिक्षक बाळू बुधवंत यांनी शाळेचा सन्मान स्वीकारला.
उल्लेखनीय कार्याचे कौतुक
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी नूतन विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. त्यांनी शाळेने भविष्यात राज्यस्तरावरही यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठा उंचावली कार्यक्रमा दरम्यान विद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात आपल्या गुणवत्तेने प्रतिष्ठा वाढवली असल्याचे अधोरेखित करण्यात आले. सर्व मान्यवरांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. नूतन विद्यालयाच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.