
४४ क्रीडा प्रकारांमध्ये १० हजारांवर खेळाडूंचा सहभाग
देहारादून : उत्तराखंड ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला २८ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड राज्यातील आठ प्रमुख शहरांत रंगणार आहे. एकूण ४४ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र संघाने गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकली होती. यावेळी देखील महाराष्ट्राचे खेळाडू आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरतील.
२८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार असल्याची पुष्टी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उत्तराखंडला २०२५ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमान म्हणून घोषित केले. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील ४४ खेळांमध्ये १० हजारांहून अधिक खेळाडू, पदाधिकारी आणि प्रशिक्षक सहभागी होणार आहेत.
उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भारतातील पारंपारिक आणि आधुनिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरेल,’ असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी सांगितले,
‘कलरीप्पयट्टू, योगासन, मल्लखांभ आणि राफ्टिंग सारख्या प्रात्यक्षिक खेळांचा समावेश राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत करण्यात आला आहे.
भारताची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही ऑलिम्पिक शैलीतील बहु क्रीडा इव्हेंट आहे. या स्पर्धेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील खेळाडूंना पदकांसाठी स्पर्धा करण्याची एकत्रित संधी मिळते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची शेवटची आवृत्ती २०२३ मध्ये गोव्यात झाली होती. त्यात महाराष्ट्राने ८० सुवर्णांसह २२८ पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते.
२०२२ची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरात राज्यात झाली होती. २०१५च्या स्पर्धेपासून सात वर्षांच्या अंतरानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पुनरुज्जीवन झाले. गुजरात येथे झालेल्या स्पर्धेत सर्व्हिसेस संघाने ६१ सुवर्णांसह १२८ पदके जिंकून अव्वल संघ पटकावले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक पदके जिंकून उपविजेतेपद मिळवले होते. गुजरात आणि गोवा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ऐतिहासिक कामगिरी बजावलेली आहे. साहजिकच महाराष्ट्राचे खेळाडू यावेळी देखील आपला दबदबा कायम ठेवत पदकांची कमाई करतील असा विश्वास महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केला आहे.
उत्तराखंड राज्यातील देहरादून (१६ क्रीडा प्रकार), हरिद्वार (३ क्रीडा प्रकार), टिहरी (७ क्रीडा प्रकार), उधमसिंह नगर (६ क्रीडा प्रकार), नैनीताल (९ क्रीडा प्रकार), चम्पावत, अल्मोडा व पिथोरागढ या ठिकाणी प्रत्येकी एका क्रीडा प्रकाराच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. एकूण ४४ क्रीडा प्रकारांचा यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २८ जानेवारी रोजी देहदादून येथील राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. स्पर्धेचा समारोप सोहळा १४ फेब्रुवारी रोजी नैनीताल येथे इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गौलापार हल्द्वानी या ठिकाणी होणार आहे.
स्पर्धेचे नियोजन
देहरादून : स्क्वॉश, तिरंदाजी, नेमबाजी, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक्स, नेटबॉल, वुशु, ज्यूदो, रग्बी सेवन, लॉन बॉल, अॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, गोल्फ.
हरिद्वार : हॉकी, कबड्डी, कुस्ती.
ऋषिकेश टिहरी : घोडेस्वारी, सिलंबम, कॅनोई, बीच हँडबॉल, बीच कबड्डी.
नई टिहरी : कयाकिंग, कॅनोइंग, रोइंग.
अल्मोडा : योगासन.
पिथोरागढ : बॉक्सिंग.
चम्पावत : राफ्टिंग.
उधमसिंह नगर : सायकलिंग ट्रॅक, सायकलिंग रोड, हँडबॉल, व्हॉलिबॉल, शूटिंग ट्रॅप अँड स्केट, मलखांब.
नैनीताल : सायकलिंग एमटीबी, कलारीपट्टू.
नैनीताल हल्द्वानी : फुटसाल, खो-खो, तायक्वांदो, मॉर्डन पेंटॉथलॉन, जलतरण, तलवारबाजी, ट्रायथलॉन.