
मुकेश चौधरीचे सामन्यात आठ बळी
नाशिक : यष्टीरक्षक फलंदाज सौरभ नवले, रामकृष्ण घोष, कर्णधार रुतुराज गायकवाड आणि मुकेश चौधरी यांच्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाचा तब्बल ४३९ धावांनी पराभव केला.
गोल्फ क्लब मैदानावर महाराष्ट्र आणि बडोदा यांच्यात रणजी सामना झाला. महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ९८.४ षटकात सर्वबाद २९७ धावा काढल्या. यात सौरभ नवले याने सर्वाधिक ८३ धावा काढल्या. सिद्धेश वीर याने ४८ धावांचे योगदान दिले. बडोदा संघाकडून अतित शेठ याने ७१ धावांत सहा विकेट घेतल्या.
बडोदा संघ पहिल्या डावात ३३.१ षटकात १४५ धावांत सर्वबाद झाला. मितेश पटेल याने सर्वाधिक ६१ धावा काढल्या. मुकेश चौधरी (३-५७), रजनीश गुरबानी (२-३१), रामकृष्ण घोष (२-३४) यांनी भेदक स्पेल टाकला.
महाराष्ट्र संघाने दुसऱ्या डावात ११९ षटकात सात बाद ४६४ असा धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला. सौरभ नवले याने सर्वाधिक नाबाद १२६ धावा काढल्या. रामकृष्ण घोष याने ९९ धावा काढल्या. कर्णधार रुतुराज गायकवाड याने ८९ धावांची आक्रमक खेळी केली. बडोदा संघाकडून मेरीवाला (२-३९), अतित शेठ (२-८०) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
बडोदा संघाचा दुसरा डाव देखील गडगडला. ३६ षटकांतच बडोदा संघ १७७ धावांवर सर्वबाद झाला. अतित शेठ याने सर्वाधिक ५१ धावा काढल्या. महाराष्ट्राच्या मुकेश चौधरी याने ७६ धावांत पाच विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. मुकेश याने सामन्यात आठ गडी बाद केले. रजनीश गुरबानी याने ५४ धावांत तीन गडी बाद केले. रामकृष्ण घोष याने २३ धावांत दोन बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली.