
आयएमपीटीटीए राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत चार जेतेपदे
मुंबई : फॉर्मात असलेल्या प्रकाश केळकर यांनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय मास्टर्स टेबलटेनिस स्पर्धेत चार विजेतेपदे पटकावून नवा विक्रम रचला.
पुरुषांच्या ६४ वर्षांहून अधिक गटात खेळताना आयएमपीटीटीए-महाराष्ट्र अ संघाचे नेतृत्व करणार्या प्रकाश केळकर यांनी अनिल रासम, नरेश शहा आणि महेश शेट्ये यांच्यासह सांघिक स्पर्धेत पहिले सुवर्ण जिंकले. महाराष्ट्र अ संघाने अंतिम फेरीत एन ताहेर आणि एसव्हीव्हीआर राव यांचा समावेश असलेल्या तेलंगणा संघाचा पराभव केला. त्यानंतर प्रकाश केळकर यांनी पुरुष एकेरी तसेच पुरुष दुहेरीमध्ये अनिल रासम आणि मिश्र दुहेरीमध्ये सुहासिनी बाकरेने बाजी मारताना तिहेरी मुकुट पटकावले.
उल्हास शिर्के यांच्या नेतृत्वाखालील योगेश देसाई, दीपक दुधाणे, अँटोनियो गोम्स यांचा समावेश असलेल्या आयएमपीटीटीए महाराष्ट्र ६९ प्लस अ संघाने अंतिम फेरीत पर्सी मेहता यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या ब संघाचा ३-० असा पराभव करत सुवर्णपदक आणि ट्रॉफी जिंकली. उल्हास शिर्केने शिवंद कुंडजे ३-१, योगेश देसाईने पर्सी मेहताचा ३-२ असा तर उल्हास व योगेश यांनी पर्सी व शिवानंदचा दुहेरीत पराभव केला. याआधी सांघिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दीपक दुधाणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी जनरल मसलदान आणि डॉ. अग्रवाल यांचा समावेश असलेल्या उत्तर प्रदेश संघाविरुद्ध दोन्ही एकेरी सामने जिंकून दिले.
पुरुषांच्या ६९ वर्षांहून एकेरी गटात माजी वर्ल्ड मास्टर्स टेबल टेनिस चॅम्पियन योगेश देसाईने एकेरीच्या अंतिम फेरीत पर्सी मेहताचा ३-२ असा पराभव केला. त्याने पुरुष दुहेरीत उल्हास शिर्केसह रौप्यपदक पटकावले. याशिवाय, पुरुषांच्या ६९ वर्षांवरील सांघिक जेतेपदात सुवर्ण जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महिलांच्या ६९ वर्षांवरील एकेरी गटामध्ये अंजली कानेटकरने अंतिम फेरीत राजस्थानच्या गीता राहरियाचा पराभव करून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.
मंगल सराफने रोमहर्षक अंतिम सामन्यात सुहासिनी बाकरेचा ३-२ असा पराभव करत नॅशनल मास्टर्स स्पर्धेत ६४ वर्षांहून अधिक महिला गटाचे विजेतेपद पटकावले, ए एम वारुणकर यांनी फायनलमध्ये राजस्थानच्या मुकुंद देव अग्रवाल यांच्यावर मात करून पुरुषांच्या ७४ एकेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुषांचे ७९ वर्षांखालील एकेरी विजेतेपद गुजरातच्या इंद्रेश पुरोहितने जिंकले. त्यांनी अंतिम फेरी ए एस शेखचा पराभव केला.