
ट्रायथलॉन स्पर्धेत महाराष्ट्राच्या डॉली पाटीलला सुवर्ण, मानसी मोहितेला रौप्य
हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी ट्रायथलॉन स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई करीत आम्हाला ‘नंबर वन’ का म्हणतात हे पुन्हा दाखवून दिले.
ट्रायथलॉन स्पर्धेत महिला गटात डॉली पाटील हिने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले, तर मानसी मोहिते हिने रौप्य पदकाची कमाई केली. ट्रायथलॉन मिश्र रिले शर्यतीत महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरूषांच्या ट्रायथलॉनमध्ये पार्थ निरगे याने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या झोळीत पहिले पदक टाकले.
महाराष्ट्राला १५ वर्षांनंतर पदक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी होणार असले, तरी २६ जानेवारीलाच ट्रायथलॉन (७५० मीटर जलतरण, २० किलो मीटर सायकलिंग, ५ किलो मीटर धावणे) क्रीडा प्रकाराने या स्पर्धेचा शंखनाद झाला आहे. हल्दवानी शहरातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये पुरुषांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूरचा दबदबा बघायला मिळाला. सरोंगबम अथौबा मैतेई याने सुवर्णपदक जिंकले, तर त्याचा राज्य सहकारी तेलहाईबा सोराम रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राच्या पार्थ निरगेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, त्याने तब्बल १५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या स्पर्धेत महाराष्ट्राला पदक जिंकून दिले, हे विशेष. याआधी २०१३च्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला ट्रायथलॉनच्या पुरूष एकेरीत पदक मिळाले होते.
महिला गटात सलग दुसर्यांदा सोनेरी यश
ट्रायथलॉनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला सलग दुसर्या वर्षी सुवर्णपदक मिळाले. डॉली पाटील हिने एकूण १ तास १० मिनिटे व ०३ सेंकद वेळेसह हे सोनेरी यश संपादन केले. दोघीही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू होय. तिचीच राज्य सहकारी मानसी मोहिते हिने रौप्यपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या आद्या सिंहला कांस्यपदक मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राला मिश्र रिले शर्यतीत सुवर्णपदक मिळाले.