
बीड : इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि उत्तराखंड ऑलिंपिक असोसिएशन द्वारा आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई संघटनेचे २४ खेळाडू महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार असल्याचे राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांनी सांगितले.
३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड येथे रंगणार असून ३२ विविध क्रीडा प्रकारांत देशभरातील खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळजवळ ९०० पुरुष व महिला खेळाडू पदाधिकारी, मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी सहभागी होत आहेत. गतवर्षीच्या गोवा येथे झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला महाराष्ट्राचा संघ यंदाही गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.
तायक्वांदो या क्रीडा प्रकारात गतवर्षी क्युरोगी आणि पुमसे प्रकारात तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र (मुंबई) संघाच्या खेळाडूंनी अनेक पदके पटकावली होती. यावेळी सुद्धा जास्तीत जास्त खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी अपेक्षा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, नीरज बोरसे, दुलिचंद मेश्राम, सदस्य अजित घारगे, सतिष खेमसकर आदींनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या संघात क्युरोगी प्रकारात निवड झालेल्या खेळाडूंमध्ये अभिजित खोपडे, आयुष ओहल, शिवम शेट्टी, करण मंदाडे, पुष्पक महाजन, गौरव भट, अभिजित सुकाले यांची निवड झाली आहे. महिला गटात साक्षी पाटील, नयन बारगजे, श्रुतिका टकले, शिवानी भिलारे, भारती मोरे, मनिषा गुट्टेदार, सिद्धी बेडांळे, अनामिका डेके, श्रावणी दांगट, श्रेया जाधव यांची निवड झाली आहे.
पुमसे प्रकारात निवड झालेल्या खेळाडूंमध्ये वंश ठाकुर व शिवम भोसले, वसुंधरा छेडे, शिवम भोसले, मृणाली हर्णेकर, वंश ठाकूर, मृणाली हर्णेकर, वसुंधरा छेडे, गौरी हिंगणे, पागिणी शर्मा व धारा धनक या खेळाडूंचा समावेश आहे.