
जितेश्री दामले, मीना गुरवेची चमकदार कामगिरी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए सीनियर महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत जालना महिला संघाने पीवायसी महिला संघाचा ३९ धावांनी पराभव केला. जितेश्री दामले व मीना गुरवे यांनी चमकदार कामगिरी बजावली.

हडपसर येथे हा सामना झाला. जालना महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात आठ बाद १४८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यात जितेश्री दामले हिने ३६ चेंडूत ५१ धावांची धमाकेदारा खेळी करुन संघाची स्थिती भक्कम केली. कार्तिकी देशमुख (२५), इशानी वर्मा (९), रुशिता जंजाळ (९), तन्वी पाटील (१०) यांनी डावाला आकार दिला.
पीवायसी महिला संघाकडून सारा कुलकर्णी (२-२६), सई शिंदे (२-१७) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
पीवायसी महिला संघासमोर विजयासाठी १४९ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पीवायसी महिला संघाने २० षटकात सात बाद १०९ धावा काढल्या. त्यात सारा कुलकर्णी हिने सर्वाधिक २८ धावा फटकावल्या. देशना मेहता (१७), सई शिंदे (नाबाद २२) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज स्वस्तात बाद झाले.
जालना महिला संघाकडून मीना गुरवे हिने २१ धावांत तीन विकेट घेत सामना गाजवला. रुशिता जंजाळ हिने १२ धावांत दोन बळी घेतले. जालना संघास आंतराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक राजू काणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.