गतविजेता भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत 

  • By admin
  • January 28, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

स्कॉटलंड संघावर १५० धावांनी विजय, गोंगडी त्रिशाचे धमाकेदार नाबाद शतक
 
क्वालालंपूर : त्रिशा गोंगडी  (नाबाद ११०) आणि जी कमलिनी (५१) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर गतविजेत्या भारतीय महिला संघाने १९ वर्षांखालील महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग सहावा विजय साकारला. स्कॉटलंड संघाचा तब्बल १५० धावांनी पराभव करत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरी गाठली आहे.

या स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय महिला संघाने सलग तीन सामने जिंकले. त्यानंतर सुपर सिक्स सामन्यातही भारतीय महिला संघाने आपला दबदबा कायम ठेवत सलग तीन विजय साकारले. सुपर सिक्समधील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात एक बाद २०८ असा धावांचा डोंगर उभारला. जी कमलिनी आणि गोंगडी त्रिशा या सलामी जोडीने १३.३ षटकात १४७ धावांची भागीदारी करुन सामन्याचे चित्र स्पष्ट करून टाकले. कमलिनी व त्रिशा या सलामी जोडीने अतिशय आक्रमक सुरुवात केली. कमलिनी ४२ चेंडूत ५१ धावांची बहारदार खेळी करुन बाद झाली. तिने नऊ चौकार मारले.

कमलिनी बाद झाल्यानंतर गोंगडी त्रिशा व सानिका चाळके या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ६१ धावा जोडल्या. गोंगडी त्रिशा या स्पर्धेत सुरेख फॉर्ममध्ये आहे. त्रिशा हिने अवघ्या ५९ चेंडूत नाबाद ११० धावांची तुफानी खेळी करत संघाची स्थिती भक्कम केली. त्रिशा हिने आपल्या शतकी खेळीत चार उत्तुंग षटकार व तेरा चौकार ठोकले. सानिका चाळके हिने २० चेंडूत नाबाद २९ धावा फटकावल्या. सानिकाने पाच चौकार मारले. स्कॉटलंड संघाकडून माईसी मासिरा हिने कमलिनीचा एकमेव बळी घेतला.

स्कॉटलंड संघासमोर विजयासाठी २०९ धावांचे मोठे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघ १४ षटकात अवघ्या ५८ धावांत गडगडला. पिप्पा केली (१२), एम्मा वॉलसिंगहॅम (१२), पिप्पा स्प्रॉल (११), नायमा शेख (नाबाद १०) यांना केवळ धावांचा दुहेरी आकडा गाठण्यात यश आले. अन्य फलंदाज स्वस्तात बाद झाले. १४व्या षटकात स्कॉटलंडचा डाव ५८ धावांत गारद झाला.

भारतीय महिला संघाकडून आयुषी शुक्ला ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. आयुषीने केवळ आठ धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला. वैष्णवी शर्मा हिने आपल्या फिरकी गोलंदाजीची जादू दाखवत अवघ्या पाच धावांत तीन बळी घेतले. गोंगडी त्रिशा हिने सहा धावांत तीन विकेट घेऊन अष्टपैलू चमक दाखवली. शतक आणि तीन विकेट अशी संस्मरणीय कामगिरी बजावणारी गोंगडी त्रिशा ही सामनावीर ठरली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *