
मासिया प्रीमियर लीग क्रिकेट : प्रमोद जाधव, विजय हांडोरे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : मासिया प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत किर्दक महावितरण चार्जर्स संघाने कुरिया इलेव्हनचा ३२ धावांनी पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात एक्स झोन स्कोडा वॉरियर्स संघाने मधुरा बिल्डर्स डायनॅमोज संघावर सहा विकेटने मोठा विजय साकारत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यांत प्रमोद जाधव आणि विजय हांडोरे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
एडीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात कुरिया इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किर्दक महावितरण चार्जर्स संघाने २० षटकात सहा बाद १६९ धावासंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना कुरिया इलेव्हन संघ २० षटकात सात बाद १३७ धावा काढण्यात यशस्वी ठरला. किर्दक महावितरण संघाने ३२ धावांनी सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या लढतीत प्रमोद जाधव याने तुफानी फलंदाजी केली. प्रमोदने ४२ चेंडूंचा सामना करताना पाच उत्तुंग षटकार व चार चौकार ठोकत ७१ धावा फटकावल्या. कुरिया जावेद याने ३६ चेंडूत ५५ धावांची धमाकेदार खेळी साकारली. जावेदने सहा चौकार व दोन टोलेजंग षटकार मारले. सिद्धार्थ खाजेकर याने १५ चेंडूत ३१ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने दोन षटकार व तीन चौकार मारले. गोलंदाजीत योगेश जाधव (२-१३), प्रदीप चव्हाण (२-१८) आणि कृष्णा पवार (२-२६) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
दुसऱ्या सामन्यात एक्स झोन स्कोडा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मधुरा बिल्डर्स डायनॅमोज संघाने २० षटकात नऊ बाद १५६ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एक्स झोन स्कोडा वॉरियर्स संघाने १८व्या षटकात पाच बाद १५९ धावा फटकावत दणदणीत विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
या सामन्यात विजय हांडोरे (८७), अमरीश हौजवाला (३२) व अक्षय गायकवाड (२६) यांनी आक्रमक फलंदाजी करत मैदान गाजवले. गोलंदाजीत प्रमोद विश्वास (३-२९), मोहन भुमरे (२-२७) व जयेश पाटील (२-२९) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक : १) किर्दक महावितरण चार्जर्स : २० षटकात सहा बाद १६९ (बाळासाहेब मगर १६, तुषार भोसले २०, प्रमोद जाधव ७१, विलास राठोड १२, सिद्धार्थ खाजेकर ३१, कृष्णा पवार २-२६, गणेश ठाणगे १-३२, संदेश लाड १-२२, अमोल शिंदे १-२८) विजयी विरुद्ध कुरिया इलेव्हन : २० षटकात सात बाद १३७ (कुरिया जावेद ५५, अमोल शिंदे १५, जितेंद्र रावत २१, गणेश ठाणगे नाबाद ६, संतोष मुंढे नाबाद २२, योगेश जाधव २-१३, प्रदीप चव्हाण २-१८, कैलास शेळके १-२६, रवी लोळगे १-१७). सामनावीर : प्रमोद जाधव.
२) मधुरा बिल्डर्स डायनॅमोज : २० षटकात नऊ बाद १५६ (अजय देशमुख ७, अमरीश हौजवाला ३२, जयेश नरवडे पाटील १९, समीर सोनवणे १०, अक्षय ढवळे १६, आलोक गोरडे २३, अक्षय गायकवाड २६, प्रमोद विश्वास ३-२९, मोहन भुमरे २-२७, संदीप राठोड २-१८, दीपक जम्मुवाल १-१६) पराभूत विरुद्ध एक्स झोन स्कोडा वॉरियर्स : १७.२ षटकात पाच बाद १५९ (विजय हांडोरे ८७, मंगेश गरड २३, संदीप राठोड २३, संदीप खोसरे ५, दीपक जम्मुवाल १२, शेख इद्रिस ५, जयेश पाटील २-२९, राहुल टोबरे १-२३, अविनाश शिंदे १-१९, आलोक गोरडे १-२६). सामनावीर : विजय हांडोरे.