
सेलूच्या नूतन विद्यालय संघाने दोन गटात पटकावले जेतेपद
छत्रपती संभाजीनगर : विभागीय आंतर शालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूल, श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, नूतन विद्यालय सेलू आणि जामगावच्या शरद रुरल पब्लिक स्कूल या संघांनी आपल्या गटात विजेतेपद पटकावले. या कामगिरीमुळे हे सर्व विजेते संघ राज्य शालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मैदानावर जिल्हा क्रीडा कार्यालय छत्रपती संभाजीनगर व जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने मंगळवारी छत्रपती संभाजीनगर विभागाची १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींची विभागीय शालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी टेनिस व्हॉलिबॉल संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, राज्य सचिव गणेश माळवे, विभागीय सचिव प्रमोद महाजन, संजय ठाकरे, क्रीडा शिक्षक भारत निंबाळकर, अंबादास उंडरे, अब्दुल बागेस, नारायण कहाटे, शैलेश सोनवणे, विकी राजपूत, निलेश माळवे, सिद्धांत लिपने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांमध्ये भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूल संघाने अटीतटीच्या सामन्यात नूतन विद्यालय सेलूच्या संघाचा २-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल संघाने नुतन विद्यालय सेलू संघाचा २-० असा सरळ सेटमध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळवले.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात नूतन विद्यालय सेलू संघाने न्यू हायस्कुल गंगापूर संघाचा २-१ असा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात नूतन विद्यालय सेलू संघाने इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळाबाजार जि. हिंगोली या संघाचा पराभव करत राज्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात शरद रूरल पब्लिक स्कूल जामगाव तसेच भागीरथी विद्यालय नालेगाव ता. गंगापूर या संघांनी नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.