
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : कोल्हापूर शहर संघास प्रथम पारितोषिक
पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि माजी खासदार रामदास तडस यांच्या वतीने वर्धा मधील देवळी येथे वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद व महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या भाग्यश्री फंड हिने हॅटट्रिक नोंदवत महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला. या स्पर्धेत कोल्हापूर शहर प्रथम, कोल्हापूर जिल्हा द्वितीय तर, पुणे जिल्ह्याला १२० गुणांसह तृतीय क्रमांकाचे सांघिक विजेतेपद मिळाले,
महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, वरिष्ठ उपाध्यक्ष माऊली आण्णा ताकवणे, जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे सल्लागार संदीप भोंडवे, विलास कथुरे, गणेश भाऊ दांगट, दिनेश गुंड, मारुती मारकड, कार्याध्यक्ष पांडाभाऊ खाणेकर, खजिनदार नवनाथ भाऊ घुले, सरचिटणीस प्रा. प्रदीप बोत्रे व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.
मेघराज कटके म्हणाले की, ‘पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्तीगीरांना पोषक वातावरण देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. या प्रयत्नांचे सार्थक करुन भाग्यश्री फंड हिने मिळविलेला विजय हा इतर महिला कुस्तीगीरांसाठी देखील प्रेरणादायी आहे.’
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या महिला कुस्तीगीरांची कामगिरी लक्षवेधक ठरली. ५० किलो वजन गटात अर्पिता गोळे हिने तृतीय क्रमांक मिळवला. ५९ किलो वजन गटात आकांक्षा नलावडे हिने तृतीय क्रमांक संपादन केले. ६५ किलो गटात प्रीतम दाभाडे याने तृतीय क्रमांक मिळवला. महिला महाराष्ट्र केसरी किताब भाग्यश्री फंड हिने पटकावला.