
हल्दवणी, उत्तराखंड : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघाने यजमान उत्तराखंडवर दणदणीत डावाने विजय मिळवित ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विजयी सलामी दिली.
गौलापूर येथील इंदिरा गांधी स्पोर्ट्स संकुलात मंगळवारी सुरू असलेल्या या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात प्रियांका इंगळे हिच्या अष्टपैलू खेळामुळे (२.२० मिनिटे नाबाद व २.१० मिनिट संरक्षण व ८ गुण) महिला संघाने उत्तराखंडवर ३७-१४ असा २३ गुण व १ डाव राखून विजय मिळविला. आश्विनी शिंदे (२.३० मि.) व सानिका चाफे (२.२० मिनिटे) यांनी तिला संरक्षणात साथ दिली. उत्तराखंडची कर्णधार भारती गिरी हिने एक मिनिटे संरक्षण करीत एकाकी लढत दिली.

पुरुष गटातही महाराष्ट्राने उत्तराखंडला ३७-२२ असे १५ गुण व एक डावाने नमविले. यात रामजी कश्यपने अष्टपैलू खेळ करताना आपल्या धारदार आक्रमणात ८ गडी बाद करीत संरक्षणात १.४६ मिनिटे पळतीचा खेळ केला. अनिकेत चेंदवणकर याने २.१० मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. उत्तराखंड संघाकडून प्रिन्स कश्यप व राहुल शर्मा यांनी प्रत्येकी ६ गडी बाद करीत लढत दिली.