
राजकोट : वरुण चक्रवर्तीच्या (५-२४) प्रभावी कामगिरीनंतर भारतीय फलंदाजांनी खराब फलंदाजी करुन तिसरा टी २० सामना २६ धावांनी गमावला. इंग्लंड संघाने या विजयासह मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे. भारतीय संघ २-१ ने या मालिकेत आघाडीवर आहे. चौथा व पाचवा टी २० सामना अनुक्रमे पुणे व मुंबईत होणार आहे.
भारतासमोर विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य होते. परंतु, भारतीय संघ ..धावा काढू शकला. अभिषेक शर्माने पाच चौकारांसह २४ धावांची आक्रमक खेळी केली. परंतु, संजू सॅमसन (३), सूर्यकुमार यादव (१४), तिलक वर्मा (१८), वॉशिंग्टन सुंदर (६) हे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्याचा फटका भारताला बसला.
हार्दिक पांड्याने एकाकी झुंज दिली. परंतु, १९व्या षटकात हार्दिक ४० धावांवर बाद होऊन तंबूत परतला. त्याने दोन षटकार व एक चौकार मारला. अक्षर पटेल (१५), ध्रुव जुरेल (२), मोहम्मद शमी (७) यांनी आपले योगदान दिले. इंग्लंडकडून जेमी ओव्हरटन याने सर्वाधिक तीन बळी घेतले. भारताने २० षटकात नऊ बाद १४५ धावा काढल्या.
वरुण चक्रवर्तीचे पाच बळी
राजकोट टी २० सामन्यात इंग्लंडने भारतासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने २० षटकांत ९ गडी गमावून १७१ धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने २८ चेंडूत ५१ धावा केल्या. वरुण चक्रवर्ती हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत २४ धावा देत ५ बळी घेतले.
तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. इंग्लंडचा सलामीवीर फिल साल्ट ५ धावांवर बाद झाला. हार्दिक पंड्याने त्याला बाद केले. बेन डकेटने २८ चेंडूत ५१ धावांची शानदार खेळी केली. त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. कर्णधार जोस बटलरने २२ चेंडूत २४ धावा केल्या. हॅरी ब्रूक पुन्हा एकदा अपयशी ठरला. ८ धावांवर ब्रुकला रवी बिश्नोईने क्लीन बोल्ड केले. लियाम लिव्हिंगस्टोन २४ चेंडूत ४३ धावा काढून बाद झाला. तळाचे फलंदाज फार धावा काढू शकले नाहीत.
वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय हार्दिक पांड्याने २ बळी मिळवले. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.