
छत्रपती संभाजीनगर : जयपूर (राजस्थान) येथे ३० व ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ११ व्या अॅथलेटिक्स आणि जलतरण राष्ट्रीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेसाठी ५० वर्षांवरील वयोगटात अंबेलोहळ येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक आणि जलतरणपटू तसेच जागतिक जलतरण साक्षरतेचे संकल्पक राजेश भोसले यांची निवड झाली आहे.
राजेश भोसले हे जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्स व जलतरण या दोन्ही क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. राजेश भोसले यांनी मागील तीन राज्यस्तरीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्स व जलतरणा या दोन्ही स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे.
जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेत राजेश भोसले हे मैदानी खेळांमध्ये
थाळी फेक, गोळा फेक व भालाफेक प्रकारात सहभागी होणार आहेत. तसेच जलतरणात ४०० मीटर फ्रीस्टाईल, २०० मीटर फ्रीस्टाईल तसेच १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकरात सहभाग नोंदविणार आहेत.
राष्ट्रीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेत निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, सुनीता सावळे, समाधान आराक, अनिलकुमार सकदेव, नानासाहेब प्रधान, राजेश्वर दुम्मलवार, गोपालकृष्ण नवले, महेंद्रसिंग पाटील, जितेंद्र पाटील, प्रशांत हिवर्डे, रावसाहेब पिठले आदींनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.