
एमसीए सचिव कमलेश पिसाळ यांची माहिती
पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी २० सामना पुणे येथे ३१ जानेवारी रोजी होणार आहे. एमसीए क्रिकेट स्टेडियमवर हा सामना आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने पायाभूत सुविधांचा विकास केला असल्याची माहिती सचिव कमलेश पिसाळ यांनी दिली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने क्रिकेट चाहते, मीडिया कर्मचारी व सामन्याला उपस्थित असलेल्या सर्व भागधारकांना सामन्याचा आनंद घेता यावा यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा केली आहे, असे सचिव कमलेश पिसाळ यांनी सांगितले.
या टी २० सामन्यासाठी पार्किंग सुविधेसाठी ४५ एकर अतिरिक्त जमीन अधिग्रहित केली आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेक्षकांना सामन्यासाठी आपल्या वाहनांची पार्किंग करणे सुलभ होणार आहे. पत्रकार व मीडिया कर्मचाऱ्यांसाठी नवीन बांधलेल्या वॉशरुममुळे त्यांची आरामदायी सोय सुनिश्चित करण्यात आली आहे. वाढती प्रेक्षक संख्या लक्षात घेऊन नॉर्थ स्टँडवरील प्रेक्षकांसाठी वॉशरुमच्या सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
मीडिया कर्मचाऱ्यांसाठी पत्रकार परिषद कक्ष अत्याधुनिक करण्यात आला आहे. त्यामुळे मीडिया कव्हरेजसाठी आधुनिक व आरामदायी वातावरण असणार आहे. स्टेडियमकडे जाणाऱ्या प्रेक्षकांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि मार्ग मार्गदर्शन करण्यास मदत करण्यासाठी पार्किंग क्षेत्रात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. वाहतूक नियंत्रण व मार्ग व्यवस्थापन पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील.
मोफत पाणी पुरवठा
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने भारत आणि न्यूझीलंड सामन्यातील अभिप्रायाची नोंद घेतली आहे आणि पाणी वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली आहे. पुरेसे पाणी संपूर्ण ठिकाणी सहज उपलब्ध असणार आहे. सामना संध्याकाळी होणार असल्याने वाढती उष्णता लक्षात घेऊन प्रेक्षकांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, असे सचिव कमलेश पिसाळ यांनी सांगितले.