
पुणे : प्रख्यात गिर्यारोहक आणि साहस क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व उमेश झिरपे यांना ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार (जीवनगौरव)’ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते उमेश झिरपे यांचा गौरव करण्यात आला.
साहस क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दलचा हा सोहळा ८ हजारी क्लब यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास अनंत पाळंदे, जयंत तुळपुळे, मंगेश जोशी, ज्ञानेश्वर तापकीर, डॉ रघुनाथ गोडबोले, चंद्रशेखर नानिवडेकर, विजय जोशी, राजेंद्र हिरेमठ, राणी पुराणिक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शैलेश टिळक, दीपक लोखंडे, डॉ संदीप श्रोत्री यांसारख्या पुण्यातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती होती.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी उमेश झिरपे यांच्या साहस क्षेत्रातील आजीवन योगदानाचे कौतुक केले. त्यांनी गिर्यारोहण आणि साहस क्रीडांमध्ये नवीन पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले. ८ हजारी क्लब, गिरिप्रेमी आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांच्या साहसी क्रीडा प्रकारांचा प्रचार व प्रसारासाठीच्या प्रयत्नांना त्यांनी गौरवले. सर्वमान्यवरांनी उमेश झिरपे यांचे याअतुलनीय सन्मानाबद्दल अभिनंदन केले. गिर्यारोहण आणि साहस क्षेत्रातील त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. ८ हजारी क्लब, गिरिप्रेमी आणि संबंधित संस्थांना भक्कम पाठिंबा देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या गौरवाबद्दल उमेश झिरपे यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. साहस क्षेत्राच्या उन्नतीसाठी संघटित प्रयत्नांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार आपल्या गुरूंना, सहकाऱ्यांना आणि आपल्याला साथ देणाऱ्या संस्थांना त्यांनी अर्पण केला.यावेळी गिरिप्रेमीचे एव्हरेस्ट शिखरवीर व इतर अष्टहजारी शिखरवीर उपस्थित होते. गिरिप्रेमीच्या भूषणहर्षे व विवेक शिवदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.