
मुंबई : लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा येथे आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑईल व ओएनजीसी पुरस्कृत ३२ व्या सीनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष, महिला आणि वयस्कर गटांत उत्कृष्ट खेळ करत प्रशांत मोरे, काजल कुमारी आणि पवन मेस्त्री यांनी विजेतेपद पटकावले.
पुरुष एकेरी गटात रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने अंतिम सामन्यात शिवतारा कॅरम क्लबच्या राहुल सोळंकी याला चुरशीच्या लढतीत २५-१०, ९-२५, १७-१६ असे पराभूत केले. अंतिम सेटच्या शेवटच्या बोर्डवर राहुलने संघर्ष केला, मात्र एक गुणाने पराभव पत्करावा लागला. विजेत्या प्रशांतने रोख १५ हजार आणि चषक जिंकला.
महिला गटात एकेरीच्या अंतिम सामन्यात इंडियन ऑईलच्या काजल कुमारीने पोस्टलच्या रिंकी कुमारीवर १२-२०, २५-९, २१-१७ असा रोमांचक विजय मिळवला. काजलने निर्णायक सेटमध्ये उत्तम कामगिरी करत ७,५०० रुपये रोख आणि चषक पटकावला.
पुरुष वयस्कर गटात हाफकिन इंस्टीट्युटच्या पवन मेस्त्री याने विजय कॅरम क्लबच्या गणेश पाटणकरवर २५-९, ९-२४, २४-५ असा विजय मिळवत रोख ५ हजार आणि चषक मिळवला.
पुरुष गटात डीकेसीसीच्या सिद्धांत वाडवलकरने शिवतारा क्लबच्या सलमान खानला २५-८, २५-१३ असे हरवले आणि तिसरा क्रमांक मिळवला. महिला गटात जैन इरिगेशनच्या मिताली पाठकने पोस्टलच्या नीलम घोडकेला २१-१२, २१-९ असे पराभूत करत तिसरा क्रमांक संपादन केला. वयस्कर गटात ए के फाउंडेशनच्या नूर महम्मद शेखने फ्रेंड्स कॅरम क्लबच्या बाबुलाल श्रीमलवर २४-१०, २५-५ असा विजय मिळवला आणि तिसरे पारितोषिक मिळवले.
पारितोषिक वितरण
विजेत्यांना एकूण १ लाख ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके, चषक, मेडल्स व प्राविण्य प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सरचिटणीस अरुण केदार, खजिनदार संजय देसाई व राज्य कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी सुहास बेडेकर, श्रीकांत गोडसे, केतन चिखले, अजित सावंत, मनोहर गोडसे आदी उपस्थित होते.