कबड्डी स्पर्धेत डॉ शिरोडकर, विजय क्लब अमरहिंद चषकाचे मानकरी

  • By admin
  • January 29, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

मेघा कदम, समर्थ कासुर्डे स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरले

मुंबई : डॉ शिरोडकर स्पोर्ट्स आणि विजय क्लब यांनी अमरहिंद मंडळाने आयोजित केलेल्या अनुक्रमे महिला आणि किशोर गटाचे जेतेपद पटकावले. डॉ शिरोडकर स्पोर्ट्स संघाची मेघा कदम महिला गटात, तर न्यू परशुराम मंडळाचा समर्थ कासुर्डे किशोर गटात सर्वोत्तम खेळाडू ठरले.

मेघा कदम हिला रोख तीन हजार तर समर्थला रोख दोन हजार तसेच प्रत्येकी बॅग व स्मृती चषक देऊन गौरविण्यात आले. दादर, पोर्तुगीज चर्च येथील मंडळाच्या पटांगणावर संपन्न झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात डॉ शिरोडकर स्पोर्ट्स संघाने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवशक्ती महिला मंडळाला ३५-३४ असे चकवत अमरहिंद चषक व रोख दहा हजार आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या शिवशक्तीला रोख पाच हजार चषकावर समाधान मानावे लागले.

महिला गट
अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात डॉ शिरोडकरने सुरुवातीपासून आघाडी राखण्यात यश मिळवले होते. विश्रांतीला २४-२१ अशी शिरोडकर संघाकडे आघाडी होती. धनश्री पोटे, साक्षी पवार यांच्या चढाई पकडीच्या खेळाने हा विजयाचा चमत्कार घडविला. शिवशक्तीच्या रुणाली भुवड, प्रतिक्षा तांडेल यांनी संघाला विजयी करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण ते व्यर्थ ठरले.

किशोर गट
किशोर गटात विजय क्लबने न्यू परशुराम मंडळाचा प्रतिकार ५१-४१ अशा मोडून काढत रोख सात हजार व अमरहिंद चषकावर आपले नाव कोरले. उपविजेत्या न्यू परशुरामला रोख चार हजार व चषकावर समाधान मानावे लागले. पूर्वार्धात समर्थ कासुराडे, रोहित चौगुले यांच्या चतुरस्त्र खेळाने २५-२३ अशी आघाडी घेणाऱ्या न्यू परशुरामला उत्तरार्धात विजय क्लबने पुरते नामोहरण केले. श्रेयस पिल्लारे, राज गुप्ता यांनी उत्तरार्धात आपला खेळ गतिमान करीत विजय क्लबच्या जेतेपदावर आपली मोहर उमटविली.

महिला गटात डॉ शिरोडकरने जिजामाता महिला संघाला ५२-१७ असे, तर शिवशक्ती संघाने मुंबई पोलीस संघाला ४२-०९ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. दोन्ही उपांत्य उपविजयी संघाना रोख तीन हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.

किशोर गटात विजय क्लबचा दबदबा
किशोर गटात विजय क्लबने यश मंडळाला ४७-३९ असे, तर न्यू परशुराम मंडळाने श्री समर्थ मंडळाला ६१-६० असे पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दोन्ही उपांत्य उपविजयी संघाना रोख दोन हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ शिरोडकरच्या धनश्री पोटलेची व शिवशक्तीच्या पौर्णिमा जेधेची स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीची खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख दोन हजार बॅग व चषक प्रदान करण्यात आले. विजय क्लबचा श्रेयस पिलारे व न्यू परशुरामचा रोहित चौगुले यांची किशोर गटात स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख एक हजार रुपये, बॅग व चषक देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रो कबड्डी स्टार श्रीकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अमरहिंद मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *