दिग्विजय जीएसटी, सीमेन्स एनर्जीझर्स उपांत्य फेरीत

  • By admin
  • January 29, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

मासिया प्रीमियर लीग : मयूर, समीर धवलशंख सामनावीर 

छत्रपती संभाजीनगर : मासिया प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत दिग्विजय जीएसटी मार्व्हलस संघाने संत एकनाथ चार्टर्ड्स संघाचा चुरशीच्या सामन्यात १४ धावांनी पराभव करुन उपांत्य फेरी गाठली आहे. दुसऱ्या सामन्यात सीमेन्स एनर्जीझर्स संघाने रेयॉन मासिया वॉरियर्स संघावर अटीतटीच्या झुंजीत १० धावांनी विजय नोंदवत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात मयूर आणि समीर धवलशंख यांनी सामनावीर किताब संपादन केला.

एडीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. दिग्विजय जीएसटी मार्व्हलस संघाने प्रथम फलंदाजी करताना १६.५ षटकात सर्वबाद ११९ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना संत एकनाथ चार्टर्ड्स संघाने १९.२ षटकात सर्वबाद १०५ धावा काढल्या. दिग्विजय जीएसटी संघाने १४ धावांनी सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या लढतीत इंद्रज मीना याने तीन षटकार व चार चौकारांसह ४४ चेंडूत ५५ धावांची धमाकेदार खेळी साकारत मैदान गाजवले. नीरव वाणी (३१), नितीन पटेल (२४) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत धनंजय वारुडीकर याने २३ धावांत चार विकेट घेत बाद फेरीचा सामना संस्मरणीय बनवला. मयूर याने १५ धावांत तीन गडी बाद केले. नितीन पटेल याने २५ धावांत तीन बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली.

दुसऱ्या सामन्यात सीमेन्स एनर्जीझर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात नऊ बाद १५३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना रेयॉन मासिया वॉरियर्स संघाने १९.४ षटकात सर्वबाद १४३ धावा काढल्या. मंगेश निटूरकर याने ३२ चेंडूत ३५ धावांची आक्रमक खेळी करत सामन्यात रोमांच आणला होता. अखेरच्या षटकात मंगेश बाद झाला आणि संघाचा विजय देखील दुरावला. निटूरकर याने १ षटकार व चार चौकार ठोकत ३५ धावांचे योगदान दिले. नितीन निकम (५१) याने चार षटकार व तीन चौकार मारले. चारुदत्त भोसले याने ३३ धावांची धमाकेदार खेळी साकारली. गोलंदाजीत निकित चौधरी (४-१२), समीर धवलशंख (३-१९), रामंधरबाबू ठुमपाल (२-३०) यांनी प्रभावी स्पेल टाकला. सीमेन्स संघाने १० धावांनी सामना जिंकला. 

संक्षिप्त धावफलक : १) दिग्विजय जीएसटी मार्व्हलस : १६.५ षटकात सर्वबाद ११९ (इंद्रज मीना ५५, गणेश सिरसेवाड ११, ज्ञानेश्वर दिंडे ११, मयूर ९, इंद्रकुमार जोगदंड १३, धनंजय वारुडीकर ४-२३, नितीन पटेल ३-२५, केदार पांडे १-१३, अमोल खंदारे १-२०) विजयी विरुद्ध संत एकनाथ चार्टर्ड्स : १९.२ षटकात सर्वबाद १०५ (विशाल नहार ६, मयंक विजयवर्गीय ६, नीरव वाणी ३१, नितीन पटेल २४, सारंग सराफ ११, शैलेश बेदमुथा ५, मयूर ३-१५, राहुल आमले २-२२, डोंगरे १-२८, इंद्रज मीना १-६). सामनावीर : मयूर.

२) सीमेन्स एनर्जीझर्स : २० षटकात नऊ बाद १५३ (चारुदत्त भोसले ३३, नितीन निकम ५१, समीर धवलशंख २१, वैभव कोकाटे नाबाद १६, निलेश जाधव ५, इतर १६, निकित चौधरी ४-१२, धर्मेंद्र वासानी १-२७, रामेश्वर रोडगे १-३४, रणजीत पाटील १-३५) विजयी विरुद्ध रेयॉन मासिया वॉरियर्स : १९.४ षटकात सर्वबाद १४३ (रामेश्वर रोडगे १३, निकित चौधरी १३, धर्मेंद्र वासानी ५, मुकेश भरते १६, किरण जगताप १९, मंगेश निटूरकर ३५, इतर २९, रामंधरबाबू ठुमपाल २-३०, समीर धवलशंख ३-१९, वैभव कोकाटे १-११, चारुदत्त भोसले १-१६, कौशिक पाटील १-३१, सत्तू पाठक १-२४). सामनावीर : समीर धवलशंख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *