
वॉटर पोलो आणि रग्बी खेळात महाराष्ट्राचे दणदणीत विजय
डेहराडून ः उत्तराखंड येथे होणार्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत गाठून एक पदक निश्चित केले आहे. दुसरीकडे वॉटर पोलोमध्ये पुरूषांनी, तर रग्बीमध्ये महिला संघाने जोरदार विजयी सलामी देत स्पर्धेत बुधवारचा दिवस गाजविला.
डेहराडूनमधीलइ त्रिशूल शुटींग रेजवरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठून सुवर्ण पदकाच्या आशा कायम ठेवल्या. प्राथमिक फेरीत तिने ६३४.५ गुणांसह दुसरे स्थान मिळविले. हरियाणाची रमिता हिने ६३४.९ गुणांसह अव्वल स्थानी राहिली. आर्या ही नाशिकची खेळाडू असून सध्या ती नवी दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. तिने आजपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत. गुरुवारी देखील ती सर्वोत्तम कामगिरी करील असा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या पथकाचे प्रशिक्षक ओंकार गोसावी यांनी व्यक्त केला.
रग्बीत महिलांची धडाकेबाज सुरुवात
डेहराडून येथे बुधवारी रग्बी स्पर्धांना प्रारंभ झाला. महिलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूची ६८-० गोल फरकाने दाणादाण उडविली. एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पूर्वार्धात ३५-० अशी जोरदार आघाडी घेतली होती.
वॉटर पोलोमध्ये दणदणीत विजय
हल्दवानी येथे सुरू असलेल्या वॉटर पोलो स्पर्धेत पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने हरियाणाला २०-० गोल फरकाने निष्प्रभ केले. एकतर्फी झालेल्या या लढतीत महाराष्ट्राच्या भूषण पाटीलने पाच गोल केले, तर सारंग वैद्यने चार गोल केले. महाराष्ट्राने वॉटर पोलोमध्ये कायमच वर्चस्व गाजविले आहे. आजही त्याचीच प्रचिती आली. सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट संगीत खेळाबरोबरच गोल नोंदविण्याबाबत अचूकता दाखवत दणदणीत विजय मिळवला.