कॅडेन्स संघाने जिंकला दोशी करंडक

  • By admin
  • January 30, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली झालेल्या पाचव्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतर क्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत अनिकेत पोरवाल (नाबाद १०६) याने केलेल्या शतकी खेळीसह शुभम कदम (४-३४) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कॅडेन्स संघाने मेट्रो क्रिकेट क्लबचा ५५ धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या अंतिम फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना कॅडेन्स संघाने ४५ षटकात ६ बाद २४२ धावांचे आव्हान उभे केले. यात अनिकेत पोरवालने १०९ चेंडूत ७ चौकार व ३ षटकाराच्या मदतीने नाबाद १०६ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्याला आर्य जाधवने ४६ चेंडूत ४ चौकार व १ षटकारासह ४१ धावा काढून साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी १११ चेंडूत ९२ धावांची भागीदारी केली.  अथर्व धर्माधिकारी २७, निपुण गायकवाड २४, मोहम्मद अरकम १५ यांनी देखील धावा काढून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

या आव्हानाचा पाठलाग करताना मेट्रो क्रिकेट क्लब संघ ४१.३ षटकात १८७ धावांवर सर्वबाद झाला. यात सोहम शिंदे ४१, नचिकेत वेर्लेकर ५९, अनंतकुमार शिंदे २४, अभिषेक जोशी १२ यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. कॅडेन्स संघाकडून शुभम कदम (४-३४), आयुष बिरादार (२-१२), अथर्व चौधरी (२-१९), आर्या जाधव (१-३८) यांनी सुरेख गोलंदाजी करून संघाला ५५ धावांनी विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील विजेत्या कॅडेन्स संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दोशी इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित दोशी, एमसीएचे माजी सचिव रियाज बागवान आणि आशुतोष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव, उपाध्यक्ष आशुतोष सोमण, खजिनदार व माजी रणजीपटू रोहित खडकीकर, इंद्रजीत कामतेकर आणि पराग शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते.  

निकाल: अंतिम फेरी:
कॅडेन्स: 45 षटकात 6बाद 242धावा(अनिकेत पोरवाल नाबाद 106(109,7×4,3×6), आर्य जाधव 41(46,4×4,1×6), अथर्व धर्माधिकारी 27, निपुण गायकवाड 24, मोहम्मद अरकम 16, वरुण चौधरी 2-24, नचिकेत वेर्लेकर 1-43, शुभम खरात 1-43) वि.वि.मेट्रो क्रिकेट क्लब: 41.3 षटकात सर्वबाद 187धावा(सोहम शिंदे 41(52,6×4), नचिकेत वेर्लेकर 59(37,4×4,5×6), अनंतकुमार शिंदे 24, अभिषेक जोशी 12, शुभम कदम 4-34, आयुष बिरादार 2-12, अथर्व चौधरी 2-19, आर्या जाधव 1-38); सामनावीर-अनिकेत पोरवाल;  कॅडेन्स संघ 55 धावांनी विजयी.

इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट फलंदाज : अथर्व धर्माधिकारी (४०५ धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : संकेत यशवंते (१६ विकेट)
मालिकावीर: अनिकेत पोरवाल (२७६ धावा, १० विकेट). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *