
नवी दिल्ली : २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा अधिकार मिळविण्यासाठी भारत केवळ आपल्या मुख्य क्षमता बळकट करण्यावरच नव्हे तर बौद्धिक क्षमतांवरही लक्ष केंद्रित करत आहे, असे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष पीटी उषा यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेत पीटी उषा यांनी ऑलिम्पिकच्या आयोजनाबद्दल सांगितले. माजी ट्रॅक अँड फील्ड स्टार उषा गांधीनगर जिल्ह्यातील देहगाम जवळील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (आरआरयू) येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संशोधन परिषदेला संबोधित करत होत्या. उषा म्हणाल्या की, परिषदेमुळे जगभरातील विविध ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन केंद्रांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील तज्ञ भारतात जमले आहेत.
पीटी उषा म्हणाल्या की, ‘ऑलिम्पिक चळवळीशी भारताचा संबंध परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे आणि स्पर्धात्मक खेळांच्या पलीकडे जाऊन खेळांद्वारे शांतता, शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणाऱ्या ऑलिम्पिकवादाच्या खऱ्या भावनेला ते स्वीकारते.
‘भारताला २०३६ चे ऑलिम्पिक आयोजित करायचे आहे’
भारताला ऑलिंपिक (२०३६) आयोजित करायचे आहे, म्हणून आम्ही केवळ आमच्या पायाभूत सुविधा क्षमताच नव्हे तर आमची बौद्धिक आणि संशोधन तयारी देखील मजबूत करत आहोत,’ असे १९८० च्या दशकात आशियाई ट्रॅक आणि फील्डवर वर्चस्व गाजवणाऱ्या पीटी उषा यांनी सांगितले.