
माजी विंबल्डन उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या तातयाना मारिया हिला अव्वल मानांकन
मुंबई : एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या
चौथ्या सत्राचे औपचारिक उद्घाटन क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथील टेनिस संकुलात ३० जानेवारी रोजी झाले. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ३१ देशांमधील मानांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
डब्लुटीए १२५००० डॉलर स्पर्धा मालिकेतील एक महत्वाची स्पर्धा असलेल्या या स्पर्धेला १ फेब्रुवारी रोजी पात्रता फेऱ्यांनी प्रारंभ होणार असून मुख्य ड्रॉ चे सामने ३ फेब्रुवारीपासून रंगणार आहेत. स्पर्धेतील अंतिम फेरीचे सामने ९ फेब्रुवारी रोजी होणार आहेत.
एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या या वर्षीच्या मालिकेत अनुभव आणि युवा खेळाडू यांच्यातील चुरस पाहावयास मिळणार आहे. एकेरीतील अव्वल मानांकन जागतिक क्रमवारीत ७३व्या स्थानी असलेल्या तातयाना मारिया हिला देण्यात आले असून ती आपल्या कारकीर्दीतील चौथ्या विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या मारिया हिने यापूर्वी विंबल्डन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून जागतिक क्रमवारीत ४२ वे स्थान हे तिचे कारकीर्दीतील सर्वोत्तम मानांकन आहे. २०२२ मध्ये ३४ वर्षापेक्षा अधिक वय असलेली ओपन टेनिसमधील ती केवळ सहावी महिला खेळाडू ठरली आहे. मारिया हिने २०२३ व २०२४ मध्ये कोलंबियातील कोपा कोलसॅनिटास ही डब्ल्यूटीए २५० दर्जाची स्पर्धा जिंकली होती.
गतविजेती लात्वियाची दरिया सेमेनिस्तजा ही जगातील सर्वात गुणवान खेळाडूंपैकी एक असून राफेल नदालने आपल्या अकादमी साठी निवडलेली फिलिपिन्सची अलेक्झांड्रा इयाला या दोन्ही खेळाडू विजेतेपदासह डब्ल्यूटीए क्रमवारीत पूर्ण १२५ गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ) व संयोजन समितीचे अध्यक्ष ओ पी गुप्ता यांनी सांगितले की, एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेच्या आणखी एका सत्राचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत असून या निमित्ताने टेनिस या खेळातील अधिकाधिक पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्याची संधी साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार उत्सुक आहे. एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेच्या दर्जाच्या भरघोस पारितोषिक रक्कम असलेल्या स्पर्धा भारतीय खेळाडूंना त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि जागतिक क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच, जागतिक क्रीडा क्षेत्राच्या नकाशावर महाराष्ट्र राज्याचा ब्रँड मोठ्या प्रमाणावर पुरस्कृत करण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची असून आजपर्यंतची ही सर्वात भव्य स्पर्धा ठरणार आहे.
महाराष्ट्राचे प्रिंसिपल सेक्रेटरी (पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था) आणि संयोजन समितीचे खजिनदार, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रवीण दराडे यांनी सांगितले की, सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेला आर्थिक पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही मुख्य प्रायोजक लार्सन अँड टूब्रो (एल अँड टी) यांचे आभार मानतो. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धा ही भारतातील सर्वाधिक प्रतिक्षित टेनिस स्पर्धा ठरली असून यंदाची स्पर्धा सर्वाधिक वैभवशाली ठरेल.
ते पुढे म्हणाले की, भारतीय खेळाडूंसाठी एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धा हे सर्वोत्तम व्यासपीठ असून गतवर्षी सहजा यमलापल्ली आणि श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती यांच्यासह महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे या खेळाडूंना या स्पर्धेचा फायदा झाला आहे. प्रार्थना ठोंबरे हिने २५० दर्जाच्या स्पर्धेत दुहेरी गटात विजेतेपद देखील पटकावले.
एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेचे चौथे सत्र भारतीय टेनिस क्षेत्रासाठी संस्मरणीय ठरणार असून भारतीय टेनिस प्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद घेता येणार आहे. स्पर्धेच्या उत्कृष्ट संयोजनासाठी संयोजन समिती अथक परिश्रम करत असून ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एल अँड टीच्या कॉर्पोरेट स्ट्रेटेजी व स्पेशल इनीशिएटीव्ह विभागाचे प्रमुख अनुप सहाय म्हणाले की, एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेने अल्पावधीतच एक उच्च स्तर गाठला असून भारतीय टेनिस क्षेत्राला एक नव्या आशेचे क्षितिज मिळवून दिले आहे. समृध्द परंपरा, इतिहास असलेल्या भारतीय टेनिस क्षेत्राला लार्सन अँड टूब्रो यांनी नेहमीच पाठिंबा दिला असून यंदाच्या एल अँड टी मुंबई ओपन टेनिस स्पर्धेमुळे भारतीय टेनिस व एल अँड टी यांच्या भागीदारीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
संयोजन समिती अध्यक्ष ओ पी गुप्ता, खजिनदार संजय खंदारे, संयोजन सचिव प्रवीण दराडे यांच्यासह अखिल भारतीय टेनिस संघटनेचे उपाध्यक्ष भरत ओझा, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस समितीचे अध्यक्ष संजीव कोठारी, महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर, स्पर्धा संचालक व क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस विभागाचे सचिव लव कोठारी या प्रसंगी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते अधिकृत पोशाखाचे अनावरण करण्यात आले.