
मुंबई : मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याने मेघालय संघाविरुद्धच्या रणजी सामन्यात एक नवा चमत्कार घडवला. शार्दुलने हॅटट्रिक नोंदवत मुंबई संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. हॅटट्रिक नोंदवणारा शार्दुल ठाकूर हा मुंबईचा पाचवा गोलंदाज बनला आहे.
शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी येथे मुंबई आणि मेघालय असा सामना सुरू आहे. या सामन्यात शार्दुल ठाकूर याने चमत्कार केला. त्याने सलग तीन चेंडूंवर तीन विकेट्स घेतल्या. त्याच्या हॅटट्रिकमुळे मुंबई संघाने सामन्यावर पकड मिळवली. मेघालय संघ पहिल्या दिवशीच ८६ धावांवर ऑलआउट झाला. शार्दुलने एकूण चार विकेट्स घेतल्या. शार्दुल व्यतिरिक्त मोहित अवस्थीने तीन आणि सिल्वेस्टर डिसूझाने दोन विकेट घेतल्या. शम्स मुलानीने एक विकेट घेतली. या सामन्यात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर खेळत नाहीत.
यापूर्वी, शार्दुलने जम्मू आणि काश्मीर संघाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शानदार शतक झळकावले होते आणि आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली होती. तथापि, त्याच्या शतकाचा संघाला फायदा झाला नाही. कारण मुंबई संघाचा जम्मू आणि काश्मीरविरुद्ध पराभव झाला. आता त्याने मेघालय विरुद्धच्या सामन्यात चेंडूने आपली जादू दाखवली आहे.
मेघालयविरुद्ध शार्दुलची हॅटट्रिक
मेघालयच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने दोन षटकांत दोन विकेट गमावल्या होत्या. पहिल्याच षटकात शार्दुलने सलामीवीर निशांत चक्रवर्तीला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकात किशन लिंगडोह बाद झाला. त्यानंतर, तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शार्दुलने प्रथम बालचंद्र अनिरुद्धला, नंतर पाचव्या चेंडूवर सुमित कुमारला आणि नंतर शेवटच्या चेंडूवर जसकीरत सिंगला बाद करून त्याची हॅटट्रिक पूर्ण केली.
सलग तीन विकेट्स घेतल्यानंतर तो मुंबईसाठी हॅटट्रिक घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. त्यांच्या आधी जहांगीर बेहरामजी खोत, उमेश नारायण कुलकर्णी, अब्दुल मुसा भोय इस्माइल आणि रॉयस्टन हॅरोल्ड डायस यांनी अशी कामगिरी केली आहे. एकेकाळी मेघालय संघाने दोन धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. तळाच्या फळीत मेघालयने प्रिंगसांग संगमाच्या १९ धावा, कर्णधार आकाश चौधरीच्या १६ धावा, अनिश चरकच्या १७ धावा आणि हिमन फुकनच्या २८ धावा यामुळे मेघालयला ८६ धावांपर्यंत मजल मारता आली.
हॅटट्रिक घेणारे मुंबईकर गोलंदाज
जहांगीर बेहरामजी खोत (बडोदा १९४३/४४)
उमेश नारायण कुलकर्णी (गुजरात १९६३/६४)
अब्दुल मूसा भोय इस्माइल (सौराष्ट्र १९७३/७४)
रॉयस्टन हॅरोल्ड डायस (बिहार २०२३/२४)
शार्दुल ठाकूर (मेघालय २०२४/२५)