
मुंबई : को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबईतर्फे विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक बुद्धिबळ स्पर्धा प्रथम मानांकित म्युनिसिपल बँकेच्या मानस सावंत याने सलग दुसऱ्यांदा जिंकली.
एमएससी बँकेच्या आदित्य जोशी विरुद्ध मानस सावंतने हत्ती व वजिराच्या सहाय्याने आक्रमक चाली रचल्या आणि नवव्या मिनिटाला मानसने आदित्यच्या राजाला शह देत अजिंक्यपदाला गवसणी घातली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे तसेच इतर पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
तृतीय क्रमांकाच्या लढतीमध्ये एनकेजीएसबी बँकेच्या विनोद मोरेने मुंबै बँकेच्या सचिन काटकर विरुद्ध अप्रतिम डावपेच लढवत २८व्या मिनिटाला विजय मिळविला. एनकेजीएसबी बँकेचा रियाल जावकर, डेक्कन मर्कंटाईल बँकेचा उमेश भोईर, म्युनिसिपल बँकेचा संजय साटम, एमएससी बँकेचा सोमनाथ स्वामी यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळविले.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या ४० बुद्धिबळपटूंच्या सहभागाने ही स्पर्धा दादर-पश्चिम येथील सीबीईयु सभागृहात रंगली. फिडे आर्बिटर विशाल माधव व सहाय्यक ओमकार चव्हाण यांनी पंचाचे कामकाज पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, भार्गव धारगळकर, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर आदी पदाधिकारी कार्यरत होते.