
मासिया प्रीमियर लीग : संतोष राजपूत, विश्वास प्रमोद सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : मासिया प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात दिग्विजय जीएसटी मार्व्हलस संघाने किर्दक महावितरण चार्जर्स संघावर सात विकेट राखून दणदणीत विजय नोंदवत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य लढतीत एक्स झोन स्कोडा वॉरियर्स संघाने सीमेन्स एनर्जीझर्स संघाचा चार विकेट राखून पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यांमध्ये संतोष राजपूत आणि विश्वास प्रमोद यांनी सामनावीर किताब संपादन केला.
एडीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. किर्दक महावितरण चार्जर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सात बाद १५० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना दिग्विजय जीएसटी मार्व्हलस संघाने १६ षटकात तीन बाद १५२ धावा फटकावत सात विकेट राखून मोठ्या फरकाने सामना जिंकला. या विजयासह दिग्विजय जीएसटी संघ अंतिम फेरीत दाखल झाला.
या लढतीत इंद्रकुमार जोगदंड याने अवघ्या ४७ चेंडूत ८३ धावांची वादळी खेळी केली. त्याने एक षटकार व अकरा चौकार ठोकले. सिद्धार्थ खाजेकर याने तीन उत्तुंग षटकार व दोन चौकारांसह १७ चेंडूत ३१ धावांची धमाकेदार खेळी साकारली. प्रमोद जाधव याने दोन षटकार व दोन चौकारांसह २१ चेंडूत २९ धावा फटकावल्या. गोलंदाजीत संतोष राजपूत याने १९ धावांत तीन विकेट घेतल्या. गणेश सिरसेवाड याने २२ धावांत दोन गडी बा केले. रवी लोळगे यो ३५ धावांत दोन बळी घेतले.
दुसऱ्या उपांत्य लढतीत सीमेन्स एनर्जीझर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सात बाद १४२ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एक्स झोन स्कोडा वॉरियर्स संघाने १७.४ षटकात सहा बाद १४३ धावा फटकावत चार विकेट राखून सामना जिंकला आणि अंतिम फेरी गाठली.
या सामन्यात विजय हांडोरे (६६), अजय गव्हाणे (३७) व मंगेश गरड (३३) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. विजय हांडोरेने ५३ चेंडूत १० चौकारांसह ६६ धावा फटकावल्या. गोलंदाजीत विश्वास प्रमोद याने ३३ धावांत तीन विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दीपक जम्मुवाल (२-३१), संदीप खोसरे (१-१८) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक : १) किर्दक महावितरण चार्जर्स : २० षटकात सात बाद १५० (अतिक खान २३, बाळासाहेब मगर १४, प्रमोद जाधव २९, विलास राठोड ६, प्रदीप चव्हाण ६, तुषार भोसले नाबाद १८, सिद्धार्थ खाजेकर ३१, योगेश जाधव नाबाद ११, इतर १२, संतोष राजपूत ३-१९, गणेश सिरसेवाड २-२२, राहुल आमले १-३८) पराभूत विरुद्ध दिग्विजय जीएसटी मार्व्हलस : १६ षटकात तीन बाद १५२ (इंद्रकुमार जोगदंड नाबाद ८३, अंकुश नखाते २३, मयूर ११, संतोष राजपूत २४, ज्ञानेश्वर दिंडे नाबाद ७, रवी लोळगे २-३५). सामनावीर : संतोष राजपूत.
२) सीमेन्स एनर्जीझर्स : २० षटकात सात बाद १४२ (कौशिक पाटील ५, गिरीश गुरवे १८, अजय गव्हाणे ३७, अजित पाटील नाबाद ३०, निलेश जाधव नाबाद २५, इतर १९, विश्वास प्रमोद ३-३३, दीपक जम्मुवाल २-३१, संदीप खोसरे १-१८) पराभूत विरुद्ध एक्स झोन स्कोडा वॉरियर्स : १७.४ षटकात सहा बाद १४३ (विजय हांडोरे ६६, मंगेश गरड ३३, विश्वास प्रमोद नाबाद १४, प्रवीण नागरे नाबाद १६, रामंधरबाबू ठुमपाल १-३०, समीर धवलशंख १-१६, कौशिक पाटील १-२४, अजित पाटील १-१७). सामनावीर : विश्वास प्रमोद.