
शरथ श्रीनिवासचे नाबाद अर्धशतक तर हितेश वाळुंजचे ३ बळी
सोलापूर : प्रसिद्ध इंदिरा गांधी मैदानावर सुरू झालेल्या शेवटच्या रणजी सामन्यात पहिल्या दिवशी त्रिपुरा संघाने पहिल्या डावात ९० षटकात ५ बाद २३० धावा केल्या. यष्टिरक्षक शरथ ६६ धावांवर खेळत आहे.
महाराष्ट्र कर्णधार अंकित बावणे याने उडवलेला टॉस जिंकून त्रिपुरा कर्णधार मनदीप सिंग याने प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर बिक्रम कुमार दास व तेजस्वी जयस्वाल जोडीने १९ षटके खेळत ६८ धावा केल्या. तेजस्वी जयस्वाल (२३) याला सिद्धेश वीर याने झेलबाद केले. त्याच्यानंतर पुढच्या षटकात श्रिदाम पॉल (१) याला हितेश वाळुंजने क्लीन बोल्ड केले. कर्णधार मनदीप सिंग फलंदाजीला आला पण पुढील षटकात बिक्रम दास (३९) देखील हितेशचा बळी ठरला.
कर्णधार मनदीप सिंग (३३) याला रामकृष्ण घोष याने बाद करुन महत्त्वाचा बळी मिळवला. रियाझउद्दीन (२६) व यष्टीरक्षक फलंदाज शरथ याने महाराष्ट्राची भेदक गोलंदाजी खेळून काढत पाचव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. १८८ धावसंख्येवर रियाझ बाद झाला. त्यानंतर आलेल्या रजत सोबत किल्ला लढवत शरथ याने अर्धशतक साजरे केले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्रिपुरा संघाने पाच बाद २३० धावा काढल्या.
किरण चोरमलेचे पदार्पण
महाराष्ट्र संघाकडून किरण चोरमले व त्रिपुरा संघाकडून रियाझ यांचे रणजी सामन्यात पदार्पण झाले. किरण चोरमले याला मुख्य प्रशिक्षक हर्षद खडीवाले यांच्याकडून कॅप देण्यात आली.