जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा पदकांचा चौकार

  • By admin
  • February 1, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

मिहीर आम्ब्रे, ऋषभ दासला सुवर्णपदक 

हलद्वानी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणात सलग तिसर्‍या दिवशी महाराष्ट्राने पदकांचा चौकार झळकविला. ऋषभ दासने २०० मीटर बॅक स्टोक्स प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली, तर मिहिर आम्ब्रे याने ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात सोनेरी यश संपादन केले. प्रतिष्ठा डांगी हिने महिलांच्या २०० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात तर अवंतिका चव्हाण हिने ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये रुपेरी यश संपादन केले.

इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियममधील जलतरण तलावात सलग तिसर्‍या दिवशी महाराष्ट्राने पदकाची लयलुट केली. ऋषभ दासने २०० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात २ मिनिटे ३.३४ सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर नाव कोरले. तामिळनाडूचा निथिक नाथेल्ला याने रौप्य, तर गुजरातचा देवांश परमार कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
मिहिर आम्ब्रे याने ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात २४.२९ सेकंदात बाजी मारत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. कर्नाटकचा श्रीहरी नटराज रौप्य, तर तामिळनाडूचा जोशुआ थॉमसने कांस्यपदक जिंकले. 

महिलांच्या गटात प्रतिष्ठा डांगीला दोन सेकंदाच्या फरकाने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. बंगालच्या सौब्रिती मोंडल हिने २ मिनिटे २४.४१ सेकंद वेळेसह सुवर्ण पदक जिंकले. ओडिशाची प्रत्याशा राय हिने कांस्यपदक जिंकले. अवंतिका चव्हाण हिने २७.२८ सेकंद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली. कर्नाटकची धिनिधी देसिंघु ही २६.९६ सेकंद वेळेसह सुवर्ण पदकाची मानकरी ठरली, तर कर्नाटकच्या निना व्यंकटेश हिला कांस्यपदक मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *