
अंतिम सामन्यात एक्स झोन स्कोडा संघावर ७४ धावांनी विजय; इंद्रराज मीना सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : मासिया प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत दिग्विजय जीएसटी मार्व्हलस संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात दिग्विजय जीएसटी संघाने एक्स झोन स्कोडा वॉरियर्स संघाचा ७४ धावांनी पराभव केला. इंद्रराज मीना याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

ए़डीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा झाली. एक्स झोन स्कोडा वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिग्विजय जीएसटी मार्व्हलस संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात चार बाद १९५ अशी भक्कम धावसंख्या उभारून सामन्यावर वर्चस्व गाजवले. एक्स झोन स्कोडा वॉरियर्स संघासमोर विजयासाटी १९६ धावांचे आव्हान होते. एक्स झोन स्कोडा संघ १६.४ षटकात १२१ धावांत सर्वबाद झाला. दिग्विजय जीएसटी संघाने ७४ धावांनी सामना जिंकून विजेतेपद पटकावले.

या सामन्यात इंद्रज मीना याने वादळी खेळी केली. त्याने अवघ्या ४७ चेंडूत ९२ धावांची धमाकेदार खेळी करताना नऊ टोलेजंग षटकार व पाच चौकार मारले. त्याचे शतक अवघ्या आठ धावांनी हुकले. शेख इद्रिस याने २७ चेंडूत ५२ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने चार उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. इंद्रकुमार जोगदंड याने २० चेंडूत नऊ चौकारांसह ४४ धावांची बदारदार खेळी केली. गोलंदाजीत गणेश सिरसेवाड (३-२५), जयंत नवरंगे (३-३३) व राहुल आमले (३-४०) यांनी उत्कृष्ट स्पेल टाकला.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
मालिकावीर : प्रमोद जाधव (किर्दक महावितरण चार्जर्स) फलंदाज : विजय हांडोरे (एक्स झोन स्कोडा वॉरियर्स)गोलंदाज : विश्वास प्रमोद (एक्स झोन स्कोडा वॉरियर्स)सामनावीर : इंद्रराज मीना (दिग्विजय जीएसटी मार्व्हलस)

पारितोषिक वितरण
विजेत्या आणि उपविजेत्या संघांना क्राइम ब्रँचचे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी आणि एएसएम इंडस्ट्रीजचे संचालक श्रीधर नवगिरे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी मासिया अध्यक्ष चेतन राऊत, स्पोर्ट्स सेक्रेटरी अजिंक्य पाथ्रीकर, समन्वयक संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मासिया स्पोर्ट्स सेक्रेटरी अजिंक्य पाथ्रीकर, संदीप पाटील, मयूर चौधरी, सुरज चामले, निकित चौधरी, गिरीश खत्री, निखिल कदम, राहुल घोगरे, राजेंद्र मगर, अमित राजळे आदींनी पुढाकार घेतला होता.
संक्षिप्त धावफलक : दिग्विजय जीएसटी मार्व्हलस : २० षटकात चार बाद १९५ (इंद्रकुमार जोगदंड ४४, अंकुश नखाते २५, इंद्रराज मीना नाबाद ९२, ज्ञानेश्वर दिंडे ७, मयूर नाबाद १५, संदीप राठोड २-२७, संदीप खोसरे १-३०, विश्वास प्रमोद १-३१) विजयी विरुद्ध एक्स झोन स्कोडा वॉरियर्स : १६.४ षटकात सर्वबाद १२१ (संदीप खोसरे १२, शेख इद्रिस ५२, मंगेश गरड ५, संदीप राठोड ११, दीपक जम्मुवाल २०, प्रवीण नागरे ११, गणेश सिरसेवाड ३-२५, जयंत नवरंगे ३-३३, राहुल आमले ३-४०, मयूर १-१५). सामनावीर : इंद्रराज मीना.