
महिला व पुरूष संघांनी सुवर्णपदक राखले; ओडिशा संघाला दोन्ही गटात
रौप्यपदक
हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेरी कामगिरी करत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदके जिंकून दुहेरी धमाका केला. चुरशीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या महिलांनी ओडिशाचा ३१-२८ असा ३ गुणांनी पराभव करीत जेतेपद राखले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने मात्र, सव्वा सात मिनिटे राखून व ६ गुणांनी (३२-२६) असा पाडाव करीत रुबाबात पुन्हा एकदा सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला ओडिशाने कडवी लढत दिली. तिसऱ्या टर्नमध्ये संरक्षण करताना एका मिनिटात महाराष्ट्राचे तीन खेळाडू बाद झाल्याने धाकधूक वाढली होती. त्यातच गौरी शिंदे पळतीच्या वेळी पाय मुरगळून जायबंदी झाल्याने ओडिशाचा हुरूप वाढला होता. मात्र, वेळीच स्वतःला सावरत सांघिक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या महिला संघाने सुवर्ण पदक राखण्यात यश मिळविले. हाफ टाइमला महाराष्ट्र संघाकडे तीन गुणांची (१५-१२) आघाडी होती. महाराष्ट्राकडून प्रियांका इंगळे, अश्विनी शिंदे, संध्या सुरवसे, रेश्मा राठोड यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. ओडिसाकडून अर्चना प्रधान, सुभश्री सिंग यांनी तोडीस तोड खेळ केला, पण त्यांना यंदाही रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
पुरुष संघाला एकतर्फी जेतेपद
पुरूष गटात महाराष्ट्राने ओडिशा संघाचा सव्वा सात मिनिटे राखून व ६ गुणांनी (३२-२६) धुव्वा उडवीत सुवर्णपदकावर रुबाबात नाव कोरले. महाराष्ट्राच्या रामजी कश्यप, सुयश गरगटे, अनिकेत चेंदवणेकर, प्रतीक वायकर, शुभम थोरात यांनी भन्नाट खेळ केला. पराभूत ओडिशाकडून पाबनी साबर, सुनील पात्रा यांनी महाराष्ट्र संघाला दिलेली झुंज अपयशी ठरली.
अजित पवारांकडून कौतुकाची थाप
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघाने सुवर्णमय कामगिरी केल्याबद्दल दोन्ही संघाचे खेळाडू, प्रशिक्षक राजेंद्र साप्ते, पंकज चवंडे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सचिव डाॅ चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड गोविंद शर्मा यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्यांचे अभिनंदन केले आहे.