
डेहराडून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक विभागात रौप्यपदक जिंकणार्या आर्या बोरसे व रुद्रांक्ष पाटील या महाराष्ट्राच्या जोडीने येथे नेमबाजी मधील १० मीटर रायफल मिश्र दुहेरीत रौप्य पदक पटकाविले. स्पर्धेत या दोघांचे हे सलग दुसरे रूपेरी यश आहे.
महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजवर रंगलेल्या १० मीटर रायफल मिश्र दुहेरीच्या लढतीत आर्या आणि रुद्रांक्ष या जोडीने पंजाबच्या ओजस्वी ठाकूर व अर्जुन बबुटा या जोडीला चिवट लढत दिली. मात्र, पंजाबच्या जोडीने महाराष्ट्राच्या जोडीवर १६-१२ असा विजय संपादन करीत सुवर्णपदकावर नाव कोरले.
महाराष्ट्राच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आर्या हिने याआधी या स्पर्धेतील दहा मीटर एअर रायफल मध्ये रौप्य पदक जिंकले होते. रुद्राक्ष यानेही याच क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावले होते.
पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करीत महाराष्ट्राने अंतिम फेरीत धडक मारली होती. सुरुवातीला महाराष्ट्राने अंतिम लढतीत पंजाब विरूद्ध दमदार नेमबाजीचे प्रदर्शन घडवले. ६-२ गुणांची आघाडी घेतल्यानंतर ८ व्या फेरीत पंजाबच्या जोडीने अचूक नेमबाजी करीत १०-१० असा अचूक नेम साधत महाराष्ट्राला मागे टाकले. अखेरच्या फेरीत आर्या व रुद्रांक्ष दबावाखाली खेळल्याने त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
आर्या ही २२ वर्षीय खेळाडू सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) खेलो इंडिया शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नवी दिल्ली येथे मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती नाशिकची असून तेथे एचपीटी महाविद्यालयात कला शाखेत ती शिकत आहे. मुंबई येथे स्नेहल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणार्या रुद्राक्ष याने जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवीत गतवेळी ऑलिंपिक कोटा मिळवला होता. त्याने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर भरघोस पदके जिंकली आहेत.