
लिजंड्स प्रीमियर लीग : रोहन शहा, शेख सादिक सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग सिझन ३ टी २० क्रिकेट स्पर्धेला शनिवारी शानदार प्रारंभ झाला. सलामीच्या सामन्यांमध्ये रोहन रॉयल्स आणि नॉन स्ट्रायकर या संघांनी विजयी सलामी दिली. या लढतीत रोहन शहा व शेख सादिक यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात रोहन रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात पाच बाद १७९ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना राउडी सुपर किंग्ज संघ १८.२ षटकात नऊ बाद १२२ धावा काढू शकला. रोहन रॉयल्स संघाने ५७ धावांनी विजय नोंदवत आगेकूच केली.
या सामन्यात रोहन शहा (५२), भास्कर जीवरग (४५), भूषण घोळवे (४०) यांनी आक्रमक फलंदाजी केली. रोहनने तीन, भास्करने पाच तर भूषणने तीन उत्तुंग षटकार मारले. गोलंदाजीत मयूर जे (२-९), गुड्डू नेहरी (२-१६) आणि विराज चितळे (२-३३) यांनी प्रभावी स्पेल टाकत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
साई श्रद्धा व नॉन स्ट्रायकर यांच्यातील दुसरा सामना रोमांचक झाला. हा सामना नॉन स्ट्रायकर संघाने एक विकेट राखून जिंकला. साई श्रद्धा संघाने प्रथम फलंदाजी करताना १७.२ षटकात सर्वबाद ८४ असे माफक लक्ष्य उभे केले. नॉन स्ट्रायकर संघाने १७.५ षटकात नऊ बाद ८८ धावा फटकावत एक विकेटने रोमांकच सामना जिंकला.
या सामन्यात निखिल मुरुमकर (४५), अमोल दौड (२६) व लहू लोहार (२२) यांनी आक्रमक फलंदाजी करत मैदान गाजवले. गोलंदाजीत सुमित आग्रे (३-१५), शेख सादिक (२-१) व निलेश सेवेकर (२-८) यांनी प्रभावी मारा करत विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : १) रोहन रॉयल्स : २० षटकात पाच बाद १७९ (सतीश भुजंगे १६, विशाल नरवडे १७, रोहन शहा ५२, मोहित घाणेकर ३४, भास्कर जीवरग नाबाद ४५, विराज चितळे २-३३, परीक्षित मुत्रक १-३८, सय्यद जलीस १-२८) विजयी विरुद्ध राउडी सुपर किंग्ज : १८.२ षटकात नऊ बाद १२२ (सय्यद जलीस १५, मनीष करवा १४, सनी ८, भूषण घोळवे ४०, धैर्यशील पाटील ११, विराज चितळे ११, मयूर जे २-९, गुड्डू नेहरी २-१६, राजेंद्र चोपडा १-१५, मोहित घाणेकर १-९, रोहन शहा १-१३). सामनावीर : रोहन शहा.
२) साई श्रद्धा : १७.२ षटकात सर्वबाद ८४ (अमित पाठक १३, निखिल मुरुमकर ४५, सतीश काळुंके १३, सुमित आग्रे ३-१५, शेख सादिक २-१, गिरीश खत्री २-१७, निलेश सेवेकर २-८, राजेश शिंदे १-२७) पराभूत विरुद्ध नॉन स्ट्रायकर : १७.५ षटकात नऊ बाद ८८ (आसिफ खान १४, सिद्धांत पटवर्धन १३, लहू लोहार नाबाद २२, अमोल दौड नाबाद २६, अमित पाठक २-१८, आसिफ शेख २-१७, कपिल पल्लोड २-१५, इम्रान अली खान १-५, सतीश काळुंके १-२५). सामनावीर : शेख सादिक.