
छत्रपती संभाजीनगर : तळागाळातील क्रीडा नैपुण्य प्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया कार्यक्रमाचा खूप फायदा झाला आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी व्यक्त केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठीच्या तरतुदीत ३५१.९८ कोटी रुपयांची भरीव वाढ करण्यात आलेली आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाला ३ हजार ७९४ कोटी रुपये देण्यात आले. ही एकूण ३५१.९८ कोटी रुपयांची वाढ आहे. पुढील वर्षात ऑलिम्पिक, राष्ट्रकुल किंवा आशियाई क्रीडा स्पर्धांसारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धा होणार नसतानाही ही वाढ लक्षणीय आहे. यामुळे देशभरातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र दूरदृष्टी असलेले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन होत आहे, असे क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी सांगितले.