नवी दिल्ली : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या सामन्यात दिल्ली संघाने रेल्वे संघाचा डावाने पराभव केला. मुंबई संघाने मेघालय संघावर एक डाव आणि ४५६ असा मोठा विजय संपादन केला.
अरुण जेटली स्टेडियममधील चाहत्यांना पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीला खेळताना पहायचे होते पण त्यांना ती संधी मिळाली नाही. कारण दिल्लीने रेल्वेचा एक डाव आणि १९ धावांनी पराभव केला. अशाप्रकारे दिल्लीने रणजी ट्रॉफी लीगमधील आपल्या मोहिमेचा शेवट रेल्वेवर बोनस गुणांनी विजय मिळवून केला. कोहलीने १२ वर्षांनंतर स्थानिक स्पर्धेत प्रवेश केला. जरी तो फलंदाजीने प्रभावित करू शकला नाही, तरी त्याच्या संघाने मोठा विजय मिळवला.
दिवसाच्या सुरुवातीला ७ बाद ३३४ धावांवरून खेळणाऱ्या दिल्लीने पहिल्या डावात ३७४ धावा करून १३३ धावांची आघाडी घेतली. रेल्वेच्या फलंदाजांनी काही निष्काळजी फटके खेळले ज्यामुळे सामन्याचा निकाल लवकर लागला. दुपारच्या सत्रात, रेल्वेचा संघ ३०.४ षटकांत ११४ धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांना एक डाव आणि १९ धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह दिल्लीला बोनससह सात गुण मिळाले. या निकालामुळे प्रेक्षकांना सामन्यात दुसऱ्यांदा स्टार फलंदाज विराट कोहली फलंदाजी पाहण्यापासून वंचित रहावे लागले.
दिल्लीकडून ऑफस्पिनर शिवम शर्माने पाच विकेट्स घेतल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या हंगामात दिल्लीचा हा दुसरा विजय होता. दिल्लीने २१ गुणांसह गटात तिसरे स्थान पटकावले. सौराष्ट्र आणि तामिळनाडूने २५-२५ समान गुण मिळवून बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या डावात रेल्वेचे फलंदाज संथ खेळपट्टीवर लवकर बाद झाल्यामुळे प्रेक्षकांना कोहलीला पाहण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या डावात फक्त १५ चेंडूत सहा धावा काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी भारतीय कर्णधार कोहली बाद झाला. कोहलीने त्याच्या सहकाऱ्यांसोबत ड्रेसिंग रूममध्ये बराच वेळ घालवला, त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि फोटो काढण्यासाठी पोझ दिली. तो विरोधी संघाच्या खेळाडूंना भेटण्यासाठी रेल्वेच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला.
सौराष्ट्र-झारखंडही जिंकले
राजकोटमध्ये आसामवर एक डाव आणि १४४ धावांनी विजय मिळवून सौराष्ट्रने बाद फेरीत प्रवेश केला. फॉलो-ऑन खेळताना, आसामचा दुसऱ्या डावात फक्त १६६ धावांवर सर्वबाद झाला, पहिल्या डावातही त्यांनी फक्त १६४ धावा केल्या होत्या. सौराष्ट्रने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. दरम्यान, झारखंडने तिसऱ्या दिवशी तामिळनाडूवर ४४ धावांनी विजय मिळवला, जो या हंगामातील त्यांचा दुसरा विजय आहे. सामन्यातील उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी उत्कर्ष सिंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या डावात ३० धावा देत सहा आणि दुसऱ्या डावात एक विकेट घेतली.
मुंबईच्या विजयात शार्दुल-कोटियन चमकले
शार्दुल ठाकूर आणि तनुश कोटियन यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या आणि मुंबईने मेघालयवर एक डाव आणि ४५६ धावांनी मोठा विजय मिळवला. यासह, संघ रणजी ट्रॉफी एलिट ग्रुप-अ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला. मुंबईचे सध्या जम्मू आणि काश्मीर इतकेच २९ गुण आहेत पण नेट रन रेटच्या आधारावर ते जम्मू आणि काश्मीरपेक्षा पुढे आहे.