
सेमवाल बहिण भावाच्या जोडीचा पदकाचा करिश्मा
डेहराडून : महाराष्ट्राच्या महिला संघाने स्क्वॅशमध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकून ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा सहावा दिवस गाजविला. अंतिम लढतीत अनिका दुबे हिनेे जखमी असताना झुंज देत सुवर्णपदक खेचून आणले. पुरूष संघाने रूपेरी यश संपादन करून स्क्वॅशमध्ये डबल धमाका घडविला. या स्पर्धेत अंजली व ओम सेमवाल या बहिण भावाच्या जोडीने पदकाचा करिश्मा घडविला आहे.

राजीव गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या स्क्वॅशमधील अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या महिलांनी पहिली लढत गमावल्यानंतर तामिळनाडूवर २-१ अशी मात केली आणि स्क्वॉश स्पर्धेतील महिलांच्या गटात सुवर्णपदक खेचून आणले. पुरुषांच्या गटात मात्र महाराष्ट्राला तामिळनाडूकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला त्यामुळे महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या आकांक्षा गुप्ता हिला तमिळनाडूच्या राधिका सिलेन हिच्याकडून ५-११, ८-११, १७-१५, ७-११ अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे तामिळनाडूला १-० अशी आघाडी मिळाली. महाराष्ट्राच्या अंजली सेमवाल हिने तामिळनाडूच्या आर पूजा आरती हिचा ७-११, १३-११, ११-८, ११-७ असा पराभव करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक लढतीत महाराष्ट्राच्या अंकिता दुबे हिने शमिना रियाज हिचा ११-९, ५-११, ११-७, ११-५ असा पराभव करीत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या लढतीमधील दुसर्या स्ट्रोक नंतर अंकिता हिच्या तोंडावर शमिनाचा धक्का लागला. त्यामुळे तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले. न खचता उपचार घेत तिने पुन्हा ही लढत खेळली आणि सुवर्ण पदकांची बाजी मारली. हे महाराष्ट्राच्या महिलांचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच सुवर्ण यश आहे. यापूर्वी गोवा स्पर्धेत कांस्य तर गुजरात स्पर्धेत रौप्य पदकावर महाराष्ट्राच्या महिला संघाला समाधान मानावे लागले होते.
पुरुषांच्या गटात तामिळनाडूच्या बी सेंथिल कुमार या आंतरराष्ट्रीय खेळाडूने महाराष्ट्राच्या सूरज चंद याच्यावर ११-७, ११-६, ११-७ अशी मात करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ अभयसिंग याने महाराष्ट्राच्या राहुल बैठा याचा असा पराभव करीत तामिळनाडूला २-० असा विजय मिळवून दिला.
देरादून उत्तराखंड येथे सुरू असलेल्या ३८ राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश खेळामध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने अंतिम सामन्यात तामिळनाडू संघाचा २-१ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले तर पुरुष संघाला अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या संघाकडून २-० असा पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्र पुरुष संघाला रौप्यपदक मिळाले.
महाराष्ट्र स्क्वॉश असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, प्रशिक्षक आनंद लाहोटी, उपपथक प्रमुख सुनील पूर्णपात्रे, तांत्रिक अधिकारी डॉ रोहिदास गाडेकर आणि संजय शेटे यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.
सुवर्णपदक महिला संघ : अंजली सेमवाल (कर्णधार), अर्णिका दुबे, आकांशा गुप्ता, सुनीता पटेल.
रौप्यपदक विजेता पुरुष संघ : राहुल बैठा, सुरज चंद, ओम सेमवाल, गौरव लड्डा.