
हरिद्वार : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कबड्डीमध्ये महाराष्ट्राला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला हरियाणाकडून २४-३९ गुणांनी पराभव पत्करावा लागला.
हरिद्वार मधील योगस्थळी क्रीडा परिसरात संपलेल्या कबड्डी स्पर्धेतील उपांत्य फेरीत हरियाणाने महाराष्ट्रावर मात केली. उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगाल हरवून महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची बलाढ्य हरियाणा संघाशी झुंज रंगली. पूर्वार्धात २१-१३ गुणांनी आघाडी घेत उत्तरार्धातही हरियाणाने आपली हुकुमत कायम राखून महाराष्ट्राला पराभूत केले. बचावात्मक खेळ केल्याने महाराष्ट्राला पराभूत व्हावे लागले. उपांत्य लढती मधील पराभूत संघांना कांस्यपदक बहाल करण्यात येते. महाराष्ट्रासह राजस्थान संघ कांस्यपदकाचा मानकरी ठरला.