
महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी
अहिल्यानगर : यंदाचा महाराष्ट्र केसरी पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला. गादीवर झालेल्या अंतिम सामन्यात तांत्रिकच्या आधारे पृथ्वीराज याने सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड याच्यावर विजय मिळवत महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड ठरला. विजेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि थार चारचाकीची चावी प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, आयोजक राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप, आमदार शिवाजीराव कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्रामभैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर येथील बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत गादीवर पार पडली.
महेंद्र आणि पृथ्वीराज यांच्यातील किताबाची अंतिम लढत रंगतदार ठरली. महेंद्रने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला. मात्र त्यात ताकदीने पृथ्वीराजने प्रतिकार करत गुण घेऊ दिला नाही. १ मिनिटानंतर दोघांच्या खात्यावर एकही गुण धारण केला नाही. महेंद्रला निष्कियतेचा इशारा देण्यात आला. महेंद्रच्या प्रशिक्षण जर्सी कास्ट्युम फाटल्याने काही काळ खेळ थांबण्यात आला. पुन्हा खेळ सुरु झाल्याानंतर महेंद्रने पकड घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ३० सेंकदाच्या कालावधीत महेंद्रने गुण न घेतल्याने पृथ्वीराजला १ गुण देण्यात आला. दरम्यान मध्यांतरपर्यत पृथ्वीराजने १-० आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये महेंद्रला एकाही गुणाची कमाई करता आली नाही. दुसऱ्या हाफ मध्ये दोघांकडूनही आक्रमक होताना दिसले. डाव प्रतिडाव सुरू होते. मात्र गुणाची कमाई मात्र झाली नाही. दोघेही तुल्यबळ असल्यामुळे सहजासहजी गुण घेऊ देत नव्हते. दरम्यान पृथ्वीराजच्या निष्क्रियतेमुळे महेंद्रला १ गुण देण्यात आला. आता १-१ अशी बरोबरी झाली. अवघा शेवटचा एकच मिनिट शिल्लक राहिला. नेमका महाराष्ट्र केसरी कोण होणार याची सर्वांनाच उत्कंठा लागली. महेंद्र मॅटच्या बाहेर गेल्याने पृथ्वीराजला १ गुण देण्यात आला. आता पृथ्वीराजचे २ तर महेंद्रचा १ गुण झाला. शेवटचे ३० सेकंद शिल्लक राहिले. महेंद्रने गुणासाठी अपील केले. मात्र ते फेटाळून लावण्यात आले. त्यामुळे महेंद्र मॅट सोडून गेला. आणि पंचानी पृथ्वीराज मोहोळ याला महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी जाहीर केले.
तत्पुर्वी सायंकाळी माती आणि गादी विभागातील दोन्ही अंतिम लढती रंगल्या. गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगली. पहिल्याच मिनिटात पृथ्वीराज याने शिवराज याला अस्मान दाखवत चितपट केले. पंचाचा हा निर्णय राक्षेला मान्य झाला नाही. त्याने रागाच्या भरात कुस्तीच्या आखाड्यात धिंगाणा घातला.
माती विभागातील अंतिम लढत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात रंगली. महेंद्रने मध्यंतरानंतर साकेत याला चितपट करत महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत प्रवेश केला.