खासदार क्रीडा महोत्सव खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ

  • By admin
  • February 3, 2025
  • 0
  • 45 Views
Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नागपूर : राज्य सरकार राज्यभरात तसेच विदर्भ भागात आणि नागपूरच्या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा पुरवत आहे. खासदार क्रीडा महोत्सव खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सव समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘मानकापूर येथे क्रीडा संकुलाचे पुनर्बांधणीचे काम ७०० कोटी खर्चून राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आले आहे. याशिवाय, नागपूरात विविध खेळांची १०० लहान मैदाने आणि स्टेडियम विकसित करण्यात आले आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणखी १५० कोटी राज्य शासनाद्वारे देण्यात येईल व त्यातून अनेक खेळांसाठी स्टेडियम बांधले जातील.’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा ‘खासदार क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव’ आता नागपूरची ओळख बनला आहे. या दोन्ही महोत्सवांच्या माध्यमातून विदर्भातील खेळाडू आणि कलाकारांना त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा व संधी मिळत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ‘खासदार क्रीडा महोत्सव’च्या माध्यमातून खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे याप्रसंगी आभार मानले.

तत्पूर्वी, स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना तसेच उत्कृष्ट प्रशिक्षकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते क्रीडा महर्षी, क्रीडा भूषण, क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

२२ दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात १,२३० संघांमधील ७६ हजार खेळाडूंनी सहभाग घेतला. खासदार क्रीडा महोत्सव हा नागपूर शहरातील ७३ मैदानांवर ५८ विविध खेळांम घेण्यात आला. या महोत्सवात खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून १२ हजार पदके आणि १.५ कोटींचे रोख बक्षीस देण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण दटके, अर्जुन पुरस्कार प्राप्त दिव्यांग खेळाडू शीतल देवी, क्रिकेटर मोहित शर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *