
पुणे : कन्याकुमारी (तामिळनाडू) येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्र सिलंबम संघाने ३४ पदकांची कमाई करुन स्पर्धा गाजवली. यात ८ सुवर्ण, १५ रौप्य आणि ११ कांस्य पदकांचा समावेश आहे.
पहिल्या खुल्या सिलंबम स्पर्धेत लाठी-काठी, तलवारबाजी, भाला चालवणे, दांडपट्टा, मडु या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, हरियाणा, पॉंडिचेरी, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यातील ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या २० खेळाडूंनी सहभाग घेत ८ सुवर्ण, १५ रौप्य आणि ११ कांस्य पदके पटकावली.
सर्व पदक विजेत्या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक आणि जनरल सेक्रेटरी कुंडलिक कचाले, प्रशिक्षक अथांग गोणेकर, सेल्वाकुमार, प्रशिक्षक ब्रह्मक्षी मस्के, मानसी भिसे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व पदक विजेत्या खेळाडूंची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश कंठाळे यांनी अभिनंदन केले.
पदक विजेते खेळाडू
कल्पक कंठाळे (दोन सुवर्ण), मल्हार केळकर (एक सुवर्ण, एक रौप्य), शौर्य कांबळे (एक सुवर्ण, एक रौप्य), विहान निकम (दोन रौप्य), व्ही एस क्रितिक (दोन रौप्य), श्रेयांश गौतमदास (दोन रौप्य), रुद्राक्ष तपासे (एक रौप्य, एक कांस्य), आदित्य माळी (एक रौप्य एक, कांस्य), यश शेठ (एक रौप्य, एक कांस्य), स्वरूप भेगडे (एक रौप्य, एक कांंस्य), वेदांत पवार (एक रौप्य, एक कांस्य), व्ही एस नलन कुमार (एक रौप्य, एक कांस्य), गुरुप्रसाद सावंत (दोन कांस्य), कृपा दोरगे (दोन सुवर्ण), करुणा दोरगे (एक सुवर्ण, एक कांस्य), आर्या शेखरे (एक सुवर्ण, एक रौप्य), देवश्री महाले (दोन रौप्य), वेदांगी महाबळ (दोन रौप्य), ज्ञानदा थोपटे (एक रौप्य, एक कांस्य), धनश्री मानकर (दोन कांस्य).