
- ऋतुजा राजधन्या, ऋषभ दासला कांस्य
हल्दवानी : उत्तराखंडातील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रतीक्षा डांगीला महिलांच्या १०० मिटर बॅक स्ट्रोक्स प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. एका सेकंदाच्या फरकाने तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मिहिर आंब्रेने ५० मिटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या ऋषभ दासला १०० मिटर बॅक स्ट्रोक्स प्रकारात, तर ऋतुजा राजधन्या हिला ५० मिटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक जिंकले.

महिलांच्या १०० मिटर बॅक स्ट्रोक्स प्रकारात महाराष्ट्राच्या प्रतीक्षा डांगी हिने १ मिनिट ७.५२ सेकंद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली. बंगालच्या मोंडल सौब्रितीने १ मिनिट ६.६६ सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले, तर ओडिशाच्या रॉय प्रत्यासाला (१:०७:७७से) कांस्यपदक मिळाले.
पुरुषांच्या १०० मिटर बॅक स्ट्रोक्स प्रकारात महाराष्ट्राच्या ऋषभ दासला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने ५६.८० सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. श्रीहरी नटराज (५६.२६ से) व आकाश मानी (५६.३६ से) या कर्नाटकच्या जलतरणपटूनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकून वर्चस्व गाजवले.
५० मिटर बटरफ्लायमध्ये रौप्य अन् कांस्य
मिहिर आंब्रेने ५० मिटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदकाची कमाई करीत महाराष्ट्राच्या झोळीत आणखी एक पदक टाकले. त्याने २५.०२ सेकंद वेळेसह हे रूपेरी यश मिळविले. तमिळनाडूचा बी रोहित आणि हरियाणाचा हर्ष सरोहा यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले. महिलांच्या ५० मिटर बटरफ्लायमध्ये महाराष्ट्राच्या ऋतुजा राजधन्या हिने २९.१२ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.