
राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धा : प्रांजली पिसे सामनावीर
उदयपूर : आंतर शालेय राष्ट्रीय १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश महिला संघाचा १६ धावांनी पराभव करुन विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राची प्रांजली पिसे ही सामनावीर किताबाची मानकरी ठरली.
राजस्थान राज्यातील उदयपूर येथे राष्ट्रीय शालेय १९ वर्षांखालील मुलींची क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र महिला संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १३८ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना उत्तर प्रदेश संघाने २० षटकात सहा बाद १२२ धावा काढल्या. महाराष्ट्र महिला संघाने चुरशीचा सामना १६ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले.

या अंतिम सामन्यात रिया भाटी गुजर (४१), जिया सिंग (३९) व प्रांजली पिसे (२८) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत रिया सिंग हिने २२ धावांत पाच विकेट घेत सामना गाजवला. धारावी टेंभुर्णे हिने १८ धावांत दोन विकेट घेतल्या. प्रांजली पिसे हिने १८ धावांत एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र महिला संघ : २० षटकात सात बाद १३८ (आरोही बांबोडे २५, रिद्धिमा मरद्वार १३, जिया सिंग ३९, प्रांजली पिसे २८, अक्षया जाधव ११, इतर १५, रिया सिंग ५-२२, किंजल चौधरी १-२२) विजयी विरुद्ध उत्तर प्रदेश महिला संघ : २० षटकात सहा बाद १२२ (कात्यायनी १५, रिया भाटी गुजर ४१, रेखा प्रजापती १४, किंजल चौधरी १६, वंदना शर्मा २०, धारावी टेंभुर्णे २-१८, प्रांजली पिसे १-१८, अक्षया जाधव १-२१). सामनावीर : प्रांजली पिसे.