
शिवभूमी शिक्षण संस्थेतर्फे स्पर्धेचे आयोजन, ५७५ खेळाडूंचा विक्रमी सहभाग
पुणे : शिक्षण महर्षी शिवाजीराव कोंडे स्मृती आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याचा फिडे मास्टर कशिश जैन याने विजेतेपद पटकावले.
शिवभूमी शिक्षण संस्थेतर्फे खेड शिवापुर येथील शिवराय मंगल कार्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत चार देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. तसेच देशातील व महाराष्ट्रातील एकूण ५७५ उच्चांकी खेळाडूंनी बुद्धिबळातील नैपुण्य सादर केले. यामध्ये २७५ आंतरराष्ट्रीय गुणांकित खेळाडूंसह ३ आंतरराष्ट्रीय मास्टर, ३ फिडे मास्टर आणि २ कॅंडिडेट मास्टर यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले १६ बुद्धिबळ पटावरील डावाचे थेट प्रक्षेपण चेस बेस इंडिया, फॉलो चेस, लीचेस, चेस डॉट कॉम आणि लाईव्ह चेस अशा विविध संकेतस्थळावर केले जात होते.

पाचवा मानांकित फिडे मास्टर जैन कशिश मनोज याने अपराजित राहत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेकरता पी आर चेस वर्ल्डने तांत्रिक सहकार्य पुरविले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव राजेंद्र कोंडे हे स्पर्धा संचालक, आंतरराष्ट्रीय पंच पवन कन्हैयालाल राठी हे स्पर्धा सचिव, आंतरराष्ट्रीय पंच श्रद्धा विंचवेकर या मुख्य पंच तर आंतरराष्ट्रीय पंच शार्दुल मनोज कुमार तपासे यांनी सहाय्यक पंच म्हणून काम बघितले. या स्पर्धेमध्ये एकूण दोन लाख एक रुपयांची रोख बक्षीस ठेवण्यात आली होती. तसेच ६१ ट्रॉफी व १०१ पदके प्रदान करण्यात आली.
पारितोषिक वितरण
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ कॉसमॉस बँकेच्या संचालिका रेखा पोकळे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीएमआरडीएचे संचालक रमेश कोंडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवभूमी शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र कोंडे यांनी केले. बंधुत्व ग्रुप धायरीचे अध्यक्ष मिलिंद पोकळे यांनी आभार मानले. या प्रसंगी रवींद्र बांडे, सचिन कोंडे, जितेंद्र कोंडे, प्रकाश शिळमकर, कोकाटे, जयवंत पिंगळे, नागनाथ हलकुडे, संतन डिसूजा, पवन राठी, श्रद्धा विंचवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध गटातील विजेते
खुला गट : १. कशिश जैन (पुणे), २. सम्मेद शेटे (कोल्हापूर), ३. प्रथमेश शेरला (पुणे), ४. श्रीराज भोसले (कोल्हापूर), ५. अविरत चव्हाण (पुणे), ६. अनिरुद्ध देशपांडे (पुणे), ७. नमित चव्हाण (पुणे), ८. निर्गुण केवल (पुणे), ९. ओंकार कडव (सातारा), १०. सुयोग वडके (पुणे).
उत्कृष्ट महिला खेळाडू : १. सेरा डगारीया (भोपाळ), २. ग्रीषा प्रसन्न पई (पुणे), ३. सई विजयसिंह पाटील (पुणे).
उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू : १. सुनील जोशी (अहिल्यानगर), २. सुनील वैद्य (पुणे), ३. माधव देवस्थळी (कोल्हापूर).
स्पर्धेचा सर्वात तरुण खेळाडू : तनिष्का जैन (पुणे). स्पर्धेचा सर्वात ज्येष्ठ खेळाडू : बी एस नाईक (कोल्हापूर).
सर्वाधिक सहभागी बुद्धिबळ खेळाडू : १. डी के बुद्धिबळ अकादमी (लोणंद, सातारा), २. कुंटे बुद्धिबळ अकादमी (पुणे), ३. व्हिक्टोरियास बुद्धिबळ अकादमी (पुणे), ४. विश्वगंगा बुद्धिबळ अकादमी (सातारा), ५. प्रीमायर बुद्धिबळ क्लासेस (सोलापूर).