
सबज्युनिअर खेळाडूंची चमकदार कामगिरी
देहरादून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघांनी अचूक वेध साधला. रिकर्व्ह व कंपाऊंड या दोन्ही प्रकारातील सांघिक गटासह रिकर्व्ह मिश्र व इंडियन मिश्र या गटात अंतिम फेरीत मजल मारल्याने महाराष्ट्राला चार सुवर्णपदक जिंकण्याची संधी प्राप्त झाली आहे.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील रिकर्व्ह विभागात महाराष्ट्राने पश्चिम बंगाल संघावर ६-० असा दणदणीत विजय मिळविला. सबज्युनिअर गटात खेळणार्या गाथा खडके, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे यांनी वरिष्ठ खेळाडूंवर मात करीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवित ठेवला. महाराष्ट्राला अंतिम फेरीत झारखंड संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. या संघात जागतिक विजेती दिपीका कुमारीचा समावेश आहे. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघाचे आव्हान ६-२ असे संपुष्टात आणले होते. झारखंडने उपांत्य फेरीत हरियाणाचा ६-२ असा पराभव केला.

कंपाऊंड क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राने तेलंगणा संघावर २२९-२२८ अशी १ गुणांनी मात केली. जागतिक विजेती व कर्णधार अदिती स्वामीच्या साथीने मधुरा धामणगावकर, प्रीतिका प्रदीप यांनी चमकदार कामगिरीचे दर्शन घडवित तेलंगणा संघाला नमवले. उपांत्यपूर्व लढतीत महाराष्ट्राने यजमान उत्तराखंड संघावर २३३-२१४ असा शानदार विजय मिळवला होता. प्राथमिक फेरीमध्ये महाराष्ट्र संघाने २१०० गुण नोंदवित स्पर्धा विक्रम नोंदविला होता. तसेच वैयक्तिक विभागात अदितीने ७०२ गुण घेत स्पर्धा विक्रम नोंदविला होता. महाराष्ट्राला सांघिक विभागात पंजाब संघाबरोबर लढत द्यावी लागणार आहे.
रिकर्व्ह मिश्र विभागात महाराष्ट्राने उपांत्य फेरीत ऑलिम्पिकपटू दीपिका कुमारी हिचा समावेश असलेल्या झारखंड संघाला ५-३ असे पराभूत करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शुकमणी बाबरेकर व गाथा खडके या जोडीने दीपिका कुमारी व गोल्डी मिश्रा यांचा पराभव केला. उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघालाही हरवले होते. इंडियन मिश्र विभागात महाराष्ट्राच्या गौरव चांदणे व भावना सत्यगिरी या जोडीने आसाम संघाचा ६-० असा दणदणीत पराभव केला