
सर्वात जलद १४ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी विराटला ९४ धावांची आवश्यकता
मुंबई : इंग्लंड संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली एका मोठ्या विक्रमाची नोंद आपल्या नावे करू शकतो. १४ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी कोहलीला केवळ ९४ धावांची गरज आहे. तीन सामन्यांमध्ये कोहली ही कामगिरी कधी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
३६ वर्षीय विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. मात्र, एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीला फॉर्म गवसला तर तो सर्वात जलद १४ हजार धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज ठरणार आहे. या बाबतीत कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम देखील मागे टाकणार आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने २००६ मध्ये त्याच्या ३५०व्या एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती. त्यावेळी सचिनने पेशावर येथे पाकिस्तान संघाविरुद्ध शतक झळकावले होते. परंतु, डकवर्थ लुईस नियमांनुसार भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.
कोहलीची एकदिवसीय कारकीर्द
कोहलीने सध्या २८३ एकदिवसीय डावांमध्ये ५८.१८ च्या सरासरीने आणि ९३.५४ च्या स्ट्राईक रेटने १३९०६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ५० शतके आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणजेच कोहली सचिनचा विक्रम मोडण्यापासून ९४ धावा दूर आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध कोहलीने तीन सामन्यात १९.३३ च्या सरासरीने ५८ धावा केल्या. त्या मालिकेत कोहलीने २४, १४ आणि २० धावा केल्या. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर कोहलीने तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत.
कोहलीची खराब फॉर्मशी झुंज
कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो पुन्हा फॉर्म मिळवण्यासाठी उत्सुक असेल. पर्थ येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावले पण इतर सामन्यांमध्ये त्याला संघर्ष करावा लागला. तो १२ वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळला, पण तिथेही त्याच्या बॅटने कामगिरी केली नाही आणि हिमांशू सांगवानच्या चेंडूवर सहा धावा काढून तो बाद झाला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होईल. पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. यानंतर, दोन्ही संघ कटक आणि अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसरा आणि तिसरा सामना खेळतील. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टीने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका खूप महत्त्वाची आहे. भारताने अलिकडेच पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत इंग्लंडचा ४-१ असा पराभव केला.