
मुंबई : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत शानदार कामगिरी करत मालिकावीर किताब पटकावला. टी २० मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला मोठे बक्षीस देण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला भारतीय संघाचा भाग बनवण्यात आले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीला भारतीय संघाचा भाग बनवण्यात आल्याने त्याला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या संघातही स्थान मिळू शकते असे संकेत मिळत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी संघात १२ फेब्रुवारीपर्यंत सर्व संघ बदल करू शकतात.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना १२ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. अशाप्रकारे, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील वरुणची कामगिरी पाहता, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समाविष्ट केले जाऊ शकते. आता वरुणची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड होते की नाही हे पाहणे रंजक ठरेल.
तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की आतापर्यंत वरुण चक्रवर्ती याने भारतीय संघासाठी एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी फक्त १८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने १४.५७ च्या सरासरीने ३३ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम कामगिरी ५/१७ होती.
इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत धमाकेदार कामगिरी
एकदिवसीय मालिकेपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात आली. या टी २० मालिकेत वरुण चक्रवर्ती सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. वरुणने ५ सामन्यांमध्ये ९.८६ च्या प्रभावी सरासरीने १४ विकेट्स घेतल्या, ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडण्यात आले.