श्री उद्यान गणेश शालेय कॅरम स्पर्धेत ध्रुव भालेराव विजेता

  • By admin
  • February 4, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती, मुंबई आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत अँटोनिओ दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा राष्ट्रीय स्तरावरील सब ज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेराव याने विजेतेपद पटकावले.

अचूक फटक्यांच्या जोरावर ध्रुव भालेराव याने आयईएस पाटकर विद्यालय डोंबिवलीच्या नील म्हात्रेचा १७-१ अशा एकतर्फी फरकाने पराभव करत अजिंक्यपद मिळवले. अंतिम फेरीत आक्रमक खेळ करत धडक मारलेल्या नील म्हात्रेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

पारितोषिक वितरण सोहळा
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला समितीचे विश्वस्त मधुकर प्रभू, व्यवस्थापक संजय आईर, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण उपस्थित होते.

इतर उल्लेखनीय कामगिरी
माघी श्री उद्यानगणेश जन्मोत्सवानिमित्त शिवाजी पार्क येथील श्री उद्यानगणेश मंदिर परिसरात आयोजित विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

या स्पर्धेत निखिल भोसले (सीईएस मायकल हायस्कूल, कुर्ला), केवल कुळकर्णी (शेठ करमशी कानजी स्कूल, मुलुंड) यांनी उपांत्य फेरी गाठली होती. पुष्कर गोळे (पोद्दार अकॅडमी स्कूल, मालाड), वेदांत पाटणकर आणि सारा देवन (आयईएस पाटकर विद्यालय, डोंबिवली), ग्रीष्मा धामणकर (व्ही एन सुळे गुरुजी हायस्कूल, दादर) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

तसेच विश्वेत बिजोतकर (हिरानंदानी फाउंडेशन स्कूल, ठाणे), सोहम जाधव (शारदाश्रम विद्यामंदिर, दादर), केतकी मुंडल्ये आणि निधी सावंत (पाटकर विद्यालय, डोंबिवली), उमैर पठाण (श्री नारायण गुरु हायस्कूल, चेंबूर), तीर्थ ठाकर (ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल, दहिसर), प्रसन्न गोळे (पोद्दार अकॅडमी स्कूल, मालाड), शेवांश नाके (युनिव्हर्सल स्कूल, ठाणे) या खेळाडूंनी बाद फेरी गाठण्यात यश मिळवले होते. सर्व उपउपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्व सहभागी खेळाडूंना मोफत टी-शर्ट देण्यात आला. स्पर्धेत पंच म्हणून सचिन शिंदे, संतोष जाधव, आणि ओमकार चव्हाण यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
समितीचे कार्यवाह डॉ अरुण भुरे, विश्वस्त किरण पाटकर आणि अविनाश नाईक यांनी शालेय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *