
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने व क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेत भारताची माजी अव्वल टेनिसपटू अंकिता रैना हिने विजयी सलामी देत सुरेख सुरुवात केली.
क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या अंकिता रैना हीने भारताच्या वैष्णवी आडकरचा ६-२, ६-२ असा पराभव करून अंतिम १६मध्ये प्रवेश निश्चित केला. पुढच्या फेरीत अंकिता समोर दुसऱ्या मानांकित कॅनडाच्या रिबेका मारीनोचे कडवे आव्हान असणार आहे.
यावेळी ३२ वर्षीय अंकिता रैना स्पर्धेबाबत बोलताना म्हणाली की, ‘या स्पर्धेत मुंबई येथे खेळण्यासाठी आल्यामुळे मला आनंद झाला आहे. ही स्पर्धा मी चौथ्यांदा अथवा पाचव्यांदा खेळत आहे. या स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड प्रदान केल्यामुळे मी एमएसएलटीएचे व स्पर्धा संचालक सुंदर अय्यर आणि प्रशांत सुतार यांचे विशेष आभार मानते. भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरील अव्वल खेळाडूंशी स्पर्धा करण्याची एक महत्वाची संधी या स्पर्धेमुळे मिळत आहे.’
अंकिता रैना पुढे म्हणाली, ‘वैष्णवी सोबत याआधी मी कधी सामना केला नाही. आम्ही एकत्रितपणे नुकताच सराव केला आहे. सामन्याची सुरुवात मी चांगली केली. वैष्णवी एक आक्रमक खेळाडू आहे हे मला माहीत आहे. तिच्यासोबत सामना खेळताना मला आनंद झाला.’
अंकिता सध्या माजी एटीपी व्यावसायिक खेळाडू व डेव्हिस कप स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्ष मंकड सोबत कार्यरत आहे.
आपल्या व्यावसायिक कार कारकिर्दी विषयी बोलताना अंकिता म्हणाली की, “मला वाटतं मी गेल्या १०-११ वर्षांपासून व्यावसायिक स्तरावर स्पर्धा खेळत आहे. आजही, मला तेव्हासारखेच वाटते. मी माझी स्वतःच एक स्पर्धक आहे आणि मी इतर येणाऱ्या खेळाडूंनाही हेच म्हणेन. तुम्ही कालपेक्षा चांगले खेळ करत आहात का हे तुम्हाला पाहण्याची गरज आहे आणि तुम्हाला त्यावर काम करत राहावे लागणार आहे. शेवटी, तुम्हाला ग्रँड स्लॅममध्ये स्पर्धा स्वतः ला सिद्ध करायचे आहे आणि तेच तुमचे ध्येय असणे गरजेचे आहे.’