
प्रेमदास कालु यांच्या स्मरणार्थ राज्य शुटींगबॉल स्पर्धेचे आयोजन
नंदुरबार (मयूर ठाकरे) : महाराष्ट्र राज्य शुटींगबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा शुटींगबॉल असोसिएशन यांच्यावतीने आयोजित प्रेमदास कालू यांच्या स्मरणार्थ आयोजित ३८व्या महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत धुळे, सोलापूर, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर या संघांनी विजेतेपद पटकावले.
राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धा सब ज्युनियर व जुनिअर मुले-मुली अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन एस ए मिशन हायस्कूलच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ डी आर हायस्कूलचे प्राचार्य पंकज पाठक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य शुटींगबॉल असोसिएशनचे सचिव के आर ठाकरे, एस ए मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नुतनवर्षा वळवी, जिल्हा टेनीक्वाईट संघटनेचे उपाध्यक्ष श्रीराम मोडक, नंदुरबार जिल्हा शुटींगबॉल संघटनेचे अध्यक्ष मीनल कुमार वळवी, जिल्हा सचिव डॉ मयुर ठाकरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शुटींगबॉल खेळाडू अशोक चौधरी, क्रीडा शिक्षक मनीष सनेर, जगदीश वंजारी, भरत चौधरी, प्रा जितेंद्र माळी, वर्षा पाटील आदी उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यभरातून ४५ संघ नंदुरबार शहरात दाखल झाले होते.
यावेळी विजेत्या संघांना शुभेच्छा देताना पंकज पाठक यांनी शुटींगबॉल सारख्या खेळात बालवयात खेळाडू सहभाग नोंदवत आहे ही महत्वपूर्ण बाब आहे अथक परिश्रम व कष्ट असणार्या खेळात खेळाडूंचा सहभाग मोठ्या संख्येने असल्यामुळे येणार्या काळात या खेळाला शासन दरबारी सर्व मान्यता मिळेल हे नक्की. यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन पाठक यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सतीश सदाराव, आकाश बोडरे, मनीष सनेर, तेजस्विनी चौधरी, रुपेश महाजन, मनीष पाटील, संतोष मराठे, राजेश्वर चौधरी, प्रा जितेंद्र माळी आदींनी परिश्रम घेतले.
अंतिम निकाल
सब ज्युनियर मुलांचा गट : १. सोलापूर, २. अहिल्यानगर, ३. छत्रपती संभाजीनगर.
सब ज्युनियर मुलींचा गट : १. धुळे, २. सोलापूर, ३. अहिल्यानगर.
ज्युनियर मुलांचा गट : १. छत्रपती संभाजीनगर, २. सोलापूर, ३. जळगाव.
ज्युनियर मुलींचा गट : १. अहिल्यानगर, २. सोलापूर, ३. कोल्हापूर.