
महिला गटात केरळ, तर पुरुष गटात सर्व्हिसेसला सुवर्ण
३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष वॉटरपोलो संघाला ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अगदी अखेरच्या क्षणी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली अन् त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचा महिला संघाने देखील रौप्य पदक पटकावले. पुरुष गटात सर्व्हिसेसला संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर महिला गटात केरळने सुवर्णपदकावर नाव कोरले.
पुरुष गटाची सुवर्ण पदकाची लढत अतिशय थरारक झाली. एक-एक गोलसाठी रंगलेल्या पाठशिवणीच्या खेळात मध्यंतरापर्यंत महाराष्ट्राकडे ६-५ अशी निसटती आघाडी होती. मात्र, त्यानंतर सर्व्हिसेसला मिळालेल्या दोन पेनल्टीने महाराष्ट्राचा घात केला. तब्बल १४ मिनिटांनंतर सर्व्हिसेसने प्रथमच ८-८ अशी बरोबरी साधली. मग महाराष्ट्राने पुन्हा ९-८ अशी आघाडी मिळविली. त्यानंतर सर्व्हिसेसने अखेरच्या मिनिटाच्या खेळ शिल्लक असताना महाराष्ट्राला ९-९ असे गाठल्याने लढतीत प्रचंड दबाव निर्माण झाला. नेमकी याच वेळी सर्व्हिसेसला पेनल्टी मिळाली अन् या संधीचे सोने करीत त्यांनी १०-९ फरकाने सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राकडून भूषण पाटील व ऋतुराज बिडकर यांनी ३-३, तर श्रेयस वैद्य, अश्विनी कुमार कुंडे व उदय पवार यांनी प्रत्येकी एक गोल केला. सर्व्हिसेसकडून अंनथू जी एसने ३, तर वैभव कुथे, भागेश कुथे व अंकित प्रसाद यांनी प्रत्येकी २ गोल केले
महिला गटाच्या अंतिम लढतीत केरळच्या बलाढ्य संघापुढे महाराष्ट्र संघाची दमछाक झाली. केरळने सुरेख पासेस आणि भन्नाट गोल करत प्रारंभीच आघाडी घेतली. हाफ टाइमपर्यंतच केरळचे ८-४ अशी मोठी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात वेगळे काही घडले नाही. केरळच्या गोलरक्षकाने महाराष्ट्राचे अनेक गोल अडवले. परिणामी शेवटी महाराष्ट्राला ७-११ गोल फरकाने पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राकडून तन्वी मुळे हिने २, तर नंदिनी मेनकर, निम शुक्ला, राजश्री गुगळे, अगरवाल व कोमल किवरे यांनी प्रत्येकी एक गोल केला
‘आजचा दिवस सर्व्हिसेसचा होता’
‘मुलं अतिशय छान खेळली. त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत सुवर्णपदकाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. मात्र, नशिबाने आम्हाला दगा दिला. अखेरच्या क्षणी
सर्व्हिसेसला पेनल्टी मिळाली अन् आम्हाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सेनादल संघाने अतिशय चांगला खेळ केला. गतवेळी याच सेनादलाला आम्ही पेनल्टी शूट आऊटपर्यंत ताणलेल्या लढतीत पाणी पाजून सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, आजचा दिवस सर्व्हिसेसचा होता, असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र पुरुष वॉटर पोलो संघाचे प्रशिक्षक रणजित श्रोत्रीय यांनी व्यक्त केली.
‘रौप्यपदक जिंकल्याचा आनंद’गतवेळी आम्ही कांस्य पदक जिंकले होते. यावेळी रौप्यपदक पटकावले. रुपेरी यशाचा साहजिकच आनंद झाला आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत काही चुका झाल्या. मात्र, तरीही केरळच्या महिलांना सुवर्णपदकाचे श्रेय द्यावे लागेल. महाराष्ट्राच्या संघाला केवळ १२ दिवसांचा कॅम्प मिळाला. याउलट केरळच्या महिला महिनाभर कॅम्प करून राष्ट्रीय सहभागी झाल्या होत्या. त्याचा त्यांना फायदा झाला. आता महाराष्ट्राला देखील कॅम्पवर भर द्यावा लागणार आहे, असे मत महाराष्ट्र महिला वॉटर पोलो संघाचे प्रशिक्षक रणजित देशमुख यांनी व्यक्त केले.