योगासन स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांना सुवर्ण

  • By admin
  • February 4, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

रुपेश सांगेने पटकावले रौप्यपदक 

अल्मोडा : महाराष्ट्राच्या महिलांनी उत्कृष्ट समन्वय दाखवीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील योगासनात सांघिक सुवर्णपदकाची बाजी मारली. सुवर्णासह एक रौप्य व एक कांस्यपदक देखील जिंकले. 

हेमवतीनंदन बहुगुणा स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सुहानी गिरीपुंजे, छकुली सेलोकर, तन्वी रेडीज, रचना अंबुलकर व पूर्वा किनरे यांनी ११२.१३ गुण नोंदवत सुवर्णपदक जिंकले. या खेळाडूंनी त्यांना दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये अतिशय विलोभनीय रचना सादर केल्या. त्यामुळे परीक्षकांनी त्यांना सर्वोत्तम गुण बहाल केले. पण प्रेक्षकांनीही त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

पुरुषांच्या कलात्मक वैयक्तिक विभागात सोलापूरचा रुपेश सांगे याने रौप्य पदक संपादन केले. अटीतटीच्या लढतीत त्याने देखील अतिशय सुरेख रचना सादर केल्या होत्या. अखेर त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. रुपेश सांगे याने ११७.८८ गुणांची कमाई केली. सुहानी हिने पारंपारिक योगासनामध्ये कांस्यपदक पटकावित आपल्या नावावर आणखी एक पदक नोंदविले. नागपूरच्या या खेळाडूने या क्रीडा प्रकारात ६०.५८ गुणांची नोंद केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *